शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई.! गावठी पिस्तुलं व ६ जिवंत काडतुसेसह आरोपीला रामलींग परिसरातून ठोकल्या बेड्या…
पुणे जिल्हा प्रतिनिधी:- अविनाश घोगरे
शिरूर तालुक्यातील रामलींग परिसरात गावठी बनावटीची दोन पिस्तुले व सहा जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या इसमाला शिताफीने अटक करत शिरूर पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. ही धाडसी कामगिरी शिरूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.
बातमी कशी उजेडात आली?
दिनांक १५ जून २०२५ रोजी पोलीस अंमलदार विजय गजानन शिंदे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत मौजे रामलींग (ता. शिरूर, जि. पुणे) येथे एक इसम गावठी पिस्तुलासह फिरत असल्याची माहिती मिळाली. सदर माहिती गंभीर स्वरूपाची असल्याने पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी तातडीने पथक तयार करून खातरजमा करून कारवाईचे आदेश दिले.
धडाकेबाज अटक आणि जप्ती
तपास पथकाने रूद्र टाईल्सच्या शेजारी सापळा लावून प्रदीप श्रीकिसन तिवारी (वय ४२, रा. साईनगर, बी.जे. हाउसिंग सोसायटी, शिरूर) यास ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडे गावठी बनावटीची दोन पिस्तुले व सहा जिवंत काडतुसे आढळून आली. ही अग्निशस्त्रे गुन्ह्याच्या उद्देशाने जवळ ठेवलेली असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे.
कायदेशीर कारवाई व कोठडी
या घटनेबाबत शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ४१७/२०२५ नुसार भारतीय हत्यार कायदा कलम ३ व २५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहेत. आरोपी प्रदीप तिवारी यास दिनांक १६ जून रोजी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यास १८ जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कारवाईमागील नेतृत्व आणि पथक
या धाडसी कारवाईसाठी शिरूर पोलीस ठाण्याचे पोसई शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अतिशय कुशलतेने भूमिका बजावली. या कारवाईमध्ये पो. ह. नाथसाहेब जगताप, अक्षय कळमकर, पो. अं. विजय शिंदे, निरज पिसाळ, नितेश थोरात, सचिन भोई, निखील रावडे, रविंद्र काळे, रविंद्र आव्हाड, अजय पाटील या कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग होता.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिप गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. शिरूर पोलिसांच्या या कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत असून स्थानिक गुन्हेगारी प्रवृत्तींच्या मुसक्या आवळण्याच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरली आहे.
No comments:
Post a Comment