नेवासा तालुक्यातील धाडगे वस्ती येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतर्फे भव्य आषाढी एकादशी दिंडी सोहळा संपन्न!



दर्पण न्यूज वृत्तसेवा प्रतिनिधी : शरद धाडगे ---

विद्यार्थ्यांच्या रूपातील विठ्ठल-रुक्मिणीने जिंकली उपस्थितांची मनं!

नेहमीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धाडगे वस्ती (नजिक चिंचोली) येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात भव्य विद्यार्थी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडी सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त आणि भरभरून प्रतिसाद दिला.

टाळ-मृदुंगाचा गजर आणि 'ज्ञानबा-तुकाराम', 'विठ्ठल-विठ्ठल'च्या जयघोषात पाऊली खेळत व फुगड्या खेळत संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. पारंपरिक वेशभूषेत नटलेले बाल वारकरी या दिंडीचे मुख्य आकर्षण ठरले.

या दिंडी सोहळ्यातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे बालरुपातील विठ्ठल आणि रुक्मिणी. पारंपरिक वस्त्रे, गळ्यात तुळशीच्या माळा आणि डोक्यावर मुकुट परिधान केलेल्या बाल गोपाळांना पाहून, जणू काही साक्षात विठ्ठल आणि रुक्मिणीच या दिंडीत अवतार घेऊन चालत आहेत, असा भावुक आणि विलोभनीय भास उपस्थितांना होत होता.

विठ्ठलाच्या भूमिकेत इयत्ता 3री चा विद्यार्थी साईराज शरद धाडगे व रुक्मिणीच्या भूमिकेत इयत्ता 3 री ची विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी अभय चौधरी हे होते.

शाळेच्या प्रांगणातून अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात निघालेली ही दिंडी धाडगे वस्ती येथील श्रीक्षेत्र शिरोमणी सावता महाराज मंदिर येथे पोहोचली. तेथे विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन दिंडीचा समारोप करण्यात आला. या दिंडीमध्ये शाळकरी मुलांसोबतच परिसरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच नागरिकांनी सहभाग नोंदवत आनंद लुटला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, ग्रामस्थ आणि पालकांनी मोलाचे सहकार्य केले. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या दिंडीमुळे परिसरात एक वेगळाच उत्साह आणि चैतन्य पाहायला मिळाले.

No comments:

Post a Comment