बेलवंडी पोलिसांचा असंवेदनशील कारभार



 चिखली घाटात आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार; नावे सांगूनही ११ जुलैच्या मध्यरात्रीच्या घटनेचा अद्याप गुन्हा नाही

श्रीगोंदा:-

अहिल्यानगर जिल्ह्यातील बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चिखली घाटात एका आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची अत्यंत संतापजनक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. ११ जुलै २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चिखली घाटातील गट नंबर ६७/१ मधील एका झोपडीजवळ ही अमानुष घटना घडली. पीडित महिलेवर सध्या अहिल्यानगर येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचार सुरू असून, तिच्या शरीरावर मारहाणीच्या गंभीर खुणा आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, पीडितेने स्वतः नराधम आरोपींची नावे उघड करूनही बेलवंडी पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही.

   मिळालेल्या माहितीनुसार, पीडित आदिवासी महिला आपल्या कुटुंबासह चिखली घाटातील गट नंबर ६७/१ मध्ये झोपडी करून राहते. ११ जुलैच्या मध्यरात्री ती मूत्र विसर्जनासाठी राहत्या झोपडीच्या मागे गेली होती. तिथे आधीच दबा धरून बसलेल्या चार ते पाच नराधमांनी अचानक तिच्यावर झडप घातली. "पारधाडानो इथून निघून जा," अशी हीन दर्जाची जातवाचक शिवीगाळ करत आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. पीडितेने जीव वाचवण्यासाठी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, नराधमांनी तिला क्रूरपणे मारहाण केली. या मारहाणीच्या खुणा तिच्या शरीरावर स्पष्टपणे उमटल्या आहेत.

    घटनेनंतर गंभीर जखमी आणि मानसिक धक्क्यात असलेल्या पीडितेच्या नातेवाईकांनी मदतीसाठी तातडीने पोलिसांच्या '११२' या आपत्कालीन क्रमांकावर कॉल केला. मात्र, नियंत्रण कक्षाकडून तत्परतेने पोलिसांचे वाहन किंवा मदत पाठवण्याऐवजी, "१०८ नंबरवर कॉल करा आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये जा," असा असंवेदनशील सल्ला देऊन जबाबदारी झटकण्यात आली.

    या घटनेतील सर्वात संतापजनक बाब म्हणजे, पीडित महिलेने स्वतःवर अत्याचार करणाऱ्या आरोपींची नावे जाहीर केली आहेत. गंभीर दुखापत झाल्यामुळे तिला तातडीने अहिल्यानगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिथे तिच्यावर उपचार व वैद्यकीय तपासणी सुरू आहे. सामूहिक बलात्कार आणि ॲट्रॉसिटीसारखा अतिशय गंभीर गुन्हा घडून आणि आरोपी निष्पन्न होऊनही, बेलवंडी पोलिसांनी अद्याप एफआयआर (FIR) दाखल केलेला नाही. पोलिसांच्या या निष्क्रियतेमुळे आरोपींना पळून जाण्यासाठी किंवा पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ मिळत असल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.

   मध्यरात्री घडलेल्या या भयानक घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि आदिवासी संघटनांचे पदाधिकारी अहिल्यानगर सिव्हिल हॉस्पिटलबाहेर जमा झाले आहेत. आरोपींची नावे समोर असतानाही बेलवंडी पोलीस कोणाला पाठीशी घालत आहेत? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. बेलवंडी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या नाहीत, तर पोलीस ठाण्यावर तीव्र ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा आदिवासी समाजाने दिला आहे.

No comments:

Post a Comment