दगडथर–घानमुख परिसरातील वन्यप्राण्यांच्या दहशतीवर तोडगा




 

लोकसहभागातून निरीक्षण मनोरा उभारण्याचा निर्णय कॉ. डी. बी. नाईक व देविदास मोहकर यांच्या आंदोलनाला यश; वन विभागासोबत चर्चेनंतर महत्त्वाचा निर्णय


दर्पण न्यूज महागाव प्रतिनिधी : अक्षय डोंगरे

महागाव तालुक्यातील दगडथर–घानमुख परिसरात गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राण्यांचा, विशेषतः अस्वलाचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात काम करणारे शेतकरी, मजूर तसेच सकाळी व सायंकाळी गावाबाहेर जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता असून वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने करण्यात येत होती.

मात्र, वन्यप्राणी अस्वलाचे रेस्क्यू करण्याची परवानगी वन विभागाला अद्याप प्राप्त नसल्याने तात्काळ कारवाई करणे शक्य नसल्याचे विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांच्या वतीने कॉ. डी. बी. नाईक, देविदास मोहकर व इतर ग्रामस्थांनी दिनांक १ जुलै २०२६ रोजी वनपरिक्षेत्र कार्यालय, महागाव येथे पुन्हा ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलनामुळे कार्यालयीन कामकाजावरही परिणाम झाला.

यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एन. ओवे, आंदोलक, ग्रामस्थ व वनरक्षक यांच्यात सविस्तर चर्चा झाली. चर्चेदरम्यान ग्रामस्थांनी वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे निर्माण झालेली भीती, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकाऱ्यांसमोर मांडला. त्यानंतर सर्वानुमते दगडथर–घानमुख गावांच्या सीमेवरील उंच ठिकाणी लोकसहभागातून तात्पुरता निरीक्षण मनोरा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

या निरीक्षण मनोऱ्याच्या माध्यमातून वन विभाग वन्यप्राण्यांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवणार असून, कोणताही वन्यप्राणी गावाच्या दिशेने येत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ गावकरी व शेतकऱ्यांना सतर्क करण्यात येणार आहे. यामुळे संभाव्य जीवितहानी टाळण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एन. ओवे यांनी याबाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला असून, सध्या निधी उपलब्ध नसल्यामुळे ग्रामस्थांच्या लोकसहभागातून व वनरक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तात्पुरता निरीक्षण मनोरा उभारण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी दगडथर परिसरातील वनरक्षकांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे.

दरम्यान, कॉ. डी. बी. नाईक व देविदास मोहकर यांनी वन विभागाने नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा तसेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बाधित नागरिकांना त्वरीत मदतनिधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पुन्हा एकदा केली. ग्रामस्थांनीही वन विभागाला आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी दर्शविली असून, हा निर्णय तात्पुरता असला तरी नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल असल्याची भावना व्यक्त केली आहे .

 या आंदोलनाचे रेठ्यामूळेच शिवाजी खराटे या गंभीर जखमीला 5 लाख आणि कायम अंधत्व आलेल्या उत्तम खराटे यांना 7 लाख 50 हजार रुपये सरळ बँक खात्यात दिनांक 1 जुलै रोजीच मिळाल्यामुळे हे एक फलित आहे, या मुळे जन्मानसात नेतृत्वा विषयी आत्मयीता निर्माण झाली आहे


No comments:

Post a Comment