दुभाजकावर कार आदळून दोघांचा जागीच मृत्यू हिंगोली-नांदेड मुख्य रस्त्यावर कळमनुरीजवळ भीषण अपघात; एक जण गंभीर जखमी
प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी
हिंगोली-नांदेड मुख्य रस्त्यावर कळमनुरीजवळ १६ जुलैच्या मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात भरधाव कार दुभाजकावर आदळल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. या दुर्दैवी घटनेमुळे हिंगोली शहरासह परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच-४३-एएल-३२५३ क्रमांकाची कार हिंगोलीहून पुसदच्या दिशेने जात असताना कळमनुरीजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार थेट दुभाजकावर जाऊन जोरदार आदळली. अपघात इतका भीषण होता की कारचा समोरील भाग पूर्णपणे चुराडा झाला.
या अपघातात परिमल राठोड (वय २४) व उदय गाजरे (वय १८) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अमोल कागणे (वय २४) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जमीर नाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक उदय यांना शेळके व इतर पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने जखमींना कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी परिमल राठोड व गाजरे मृत घोषित केले. १७ जुलै रोजी हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. वृत्त लिहिपर्यंत कळमनुरी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद अथवा गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. अपघातात मृत्यू झालेले परिमल राठोड व उदय गाजरे हे हिंगोली शहरातील एनटीसी परिसरातील 'फिट अँड बोल्ड' जिममध्ये प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. अल्पवयात झालेल्या त्यांच्या दुर्दैवी निधनामुळे क्रीडा व फिटनेस क्षेत्रासह मित्रपरिवार आणि नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

No comments:
Post a Comment