भिगवण येथे बीएनएचएस-सिप्ला फाउंडेशनच्या वतीने मोहीम



 २१ हजार पाणथळ वनस्पतींचेही पुनर्स्थापन, मच्छीमारांच्या उपजीविकेला आशा* *उजनी जलाशयात ४२ लाख देशी मत्स्यबीजांचे संचयन; ‘उजनीचा वाघ’ म्हणून ओळखला जाणारा महाशीर पुन्हा जलाशयात

*दर्पण न्यूज इंदापूर तालुका प्रतिनिधी :- अंकुश भोसले*

*भिगवण (ता. इंदापूर)* : उजनी जलाशयातील मत्स्यसंपदा समृद्ध करणे आणि जलपरिसंस्थेचे संवर्धन करणे या उद्देशाने भिगवण येथे भव्य देशी मत्स्यबीज संचयन सोहळा संपन्न झाला. याअंतर्गत विविध देशी प्रजातींचे ४२ लाख मत्स्यबीज तसेच २१ हजार स्थानिक पाणथळ वनस्पती उजनी जलाशयात सोडण्यात येत आहेत. हा उपक्रम बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) व सिप्ला फाउंडेशन यांच्या वतीने राबविला जात आहे.

वाढते प्रदूषण, अवैध व लहान जाळ्यांची मासेमारी तसेच पाणवनस्पतींचा ऱ्हास यामुळे उजनी जलाशयातील जैविक साखळी गंभीर धोक्यात आली होती. यातून जलाशयातील अनेक देशी माशांच्या प्रजाती नामशेष झाल्या, तर काही प्रजाती नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचल्या होत्या. ही परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी बीएनएचएसने ‘पाणथळ जागा, पर्यावरण पुनर्स्थापना आणि मत्स्यव्यवसाय विकास’ या कार्यक्रमांतर्गत हा संवर्धन प्रकल्प हाती घेतला आहे.

*'उजनीचा वाघ’ परततोय*

‘पाण्यातील वाघ’ म्हणून ओळखला जाणारा दुर्मिळ डेक्कन महाशीर अर्थात खडसऱ्या माशाच्या मत्स्यबीजाचाही या मोहिमेत समावेश आहे. गेल्या काही दशकांत उजनीसह राज्यातील अनेक नद्या व जलाशयांतून हा मासा जवळपास नाहीसा झाला होता. यावेळी टाटा पॉवरच्या लोणावळा येथील केंद्रात संवर्धित केलेली महाशीरची मत्स्यबीजे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

महाशीरसह बोबरी, कवडस, रोहू, कटला आणि मृगल या देशी व कार्प जातींच्या बोटुकल्या उजनीच्या फुगवटा क्षेत्रात टप्प्याटप्प्याने सोडल्या जाणार आहेत. बीएनएचएसच्या वतीने बोबरी व कवडस या देशी माशांचे प्रजनन यशस्वीरीत्या करण्यात आले असून काही प्रजातींचे बीज वाहत्या पाण्यातून संकलित करण्यात आले आहे.

*परिसंस्थेला नवसंजीवनी*

जलाशयात नष्ट झालेल्या पाणवनस्पतींचे पुनर्स्थापन केल्याने माशांना अंडी घालण्यासाठी, आश्रय घेण्यासाठी व अन्नशृंखला टिकवण्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण होणार आहे. त्यामुळे केवळ मत्स्यसंपदाच नव्हे, तर पक्षी, सूक्ष्मजीव आणि संपूर्ण जलपरिसंस्थेचेही संतुलन सुधारण्यास मदत होणार आहे.

या उपक्रमाचा सर्वाधिक लाभ स्थानिक मच्छीमार बांधवांना होणार आहे. देशी माशांची संख्या वाढल्याने भविष्यात मासेमारीत उत्पादन वाढण्याची शक्यता असून, त्यातून मच्छीमारांच्या उपजीविकेला शाश्वत आधार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

*प्रकल्पाला निधीचा पाठिंबा*

उजनी जलाशयाच्या पर्यावरणीय पुनर्संचयनासाठी बीएनएचएस व महाराष्ट्र जलसंपदा विभाग यांच्यात सामंजस्य करार झाला असून, त्याला सिप्ला फाउंडेशनचा पाठिंबा आहे. तसेच जैवविविधता संवर्धन व परिसरातील स्थानिकांच्या उपजीविकेसाठी ‘मित्रा’तर्फे जिल्हा प्रशासनाला १६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला होता.

या कार्यक्रमाला कृषीमंत्री मा.दत्तात्रय भरणे, बीएनएचएसचे संचालक श्री.किशोर रिठे, सिप्ला फाउंडेशनचे श्री.अनुराग मिश्रा, टाटा पॉवरच्या जैवविविधता विभागाचे प्रमुख श्री.विवेक विश्वासराव, मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त श्री.विजय शिखरे, सहाय्यक संचालक व वरिष्ठ शास्त्रज्ञ बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी डॉ.उन्मेश काटवटे, जिल्हा परिषद सदस्या हेमाताई माडगे,श्री. सचिन बोगावत, श्री. भरतजी‌ मल्लाव, श्री.चंद्रकांत भोई, सौ.उज्वलाताई परदेशी,सौ.अनिता नगरे,श्री.अनिल नगरे,अमोल पतुरे,श्री.बाळासाहेब सल्ले,श्री. युवराज नगरे,श्री. नवनाथ परदेशी, श्री.पद्येश भोई,श्री. बलभीम भोई,श्री.अशोक नगरे श्री.बालाजी मल्लाव,श्री.ज्ञानेश्वर भोई ,श्री.परशुराम सल्ले,श्री.महेश माने,श्री.नितीन परतुरे,श्री.लतीफ काळे,श्री.अतुल पतुरे तसेच स्थानिक मच्छीमार उपस्थित होते.

*अपेक्षा*

या मोहिमेमुळे उजनी जलाशयातील नामशेष व दुर्मिळ मत्स्य प्रजातींचे पुनरुज्जीवन होण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर जलाशयाचे पर्यावरणीय वैभव पुन्हा उभे राहण्यासोबतच भिगवण परिसरातील पर्यावरण संतुलन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ मिळणार आहे.

No comments:

Post a Comment