ऑक्टोबर हिटचा तडाखा; नंदुरबारचा पारा ३५ अंशांवर!
खरीपची कोरडवाहू पिके वाया; आता बागायती पिकांनाही उन्हाच्या झळा, शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट
आक्राळे : नंदुरबार शहरासह जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा सहन करावा लागत असून, तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील कोरडवाहू पिकांची अवस्था आधीच बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी पावसाअभावी पिके वाया गेली असून, आता वाढत्या उन्हाचा फटका बागायती पिकांनाही बसू लागल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
पावसाअभावी कोरडवाहू पिकांचे नुकसान
खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने काहीशी साथ दिल्यानंतर दीर्घकाळ पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर महिनाभरापासून पाऊस नसल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. पावसावर अवलंबून असलेली कापूस, बाजरी, मूग, उडीद, तूर आदी कोरडवाहू पिके अनेक ठिकाणी सुकू लागली आहेत. काही पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
बागायती पिकांनाही उन्हाचा फटका
कोरडवाहू पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या अपेक्षा बागायती पिकांवर आहेत. मात्र, वाढत्या तापमानामुळे या पिकांनाही उन्हाच्या झळा बसत आहेत. जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असल्याने पिकांना नियमित सिंचनाची गरज भासत आहे.
विहीर व कूपनलिकांच्या पाण्यावर पिके टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त सिंचन करावे लागत आहे. मात्र, पावसाअभावी भूजलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नसल्याने उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागत आहे. त्यामुळे पिकांना पाणी देण्याचे नियोजन शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.
शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट
एकीकडे पावसाअभावी खरीप हंगामातील कोरडवाहू पिकांचे नुकसान झाले आहे, तर दुसरीकडे बागायती पिके वाचविण्यासाठी अतिरिक्त सिंचनाचा खर्च करावा लागत आहे. वाढत्या तापमानामुळे पिकांना वारंवार पाणी देण्याची गरज भासल्यास उत्पादन खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
उन्हाचा चटका कायम राहिल्यास बागायती पिकांच्या वाढीवर व उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पिके वाचविण्याची धडपड सुरू आहे.
दुपारच्या उन्हाने नागरिक हैराण
सकाळी वातावरण काहीसे आल्हाददायक असले तरी सकाळी ९ वाजेनंतर उन्हाची तीव्रता जाणवू लागते. दुपारी १२ ते ४ या वेळेत उष्णतेचा तडाखा अधिक जाणवत असल्याने नागरिकांची वर्दळ कमी होत आहे. उन्हापासून बचावासाठी टोपी, गॉगल, छत्री तसेच डोक्यावर कापडाचा वापर केला जात आहे.
वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांकडून पाण्याचे सेवन वाढले असून, लिंबूपाणी व शीतपेयांचा आधार घेतला जात आहे. शेतकरी, शेतमजूर, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी तीव्र उन्हात विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
पशुधनाचीही काळजी
वाढत्या तापमानाचा परिणाम पशुधनावरही होण्याची शक्यता आहे. जनावरांना सावलीत ठेवणे, पुरेसे पाणी उपलब्ध करून देणे आणि दुपारच्या तीव्र उन्हात त्यांना बाहेर न सोडण्याकडे शेतकरी लक्ष देत आहेत.
खरीप हंगामातील कोरडवाहू पिके पावसाअभावी वाया गेल्यानंतर आता बागायती पिके वाचविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे.

No comments:
Post a Comment