आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मूर्तिजापूर येथे दंगा काबू योजनेची रंगीत तालीम
प्रतिनिधी गजानन चव्हाण
आगामी सण-उत्सव शांततेत व सुरक्षित वातावरणात पार पडावेत तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी मा. पोलीस अधीक्षक, अकोला यांच्या आदेशानुसार मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने मंगळवारी (दि. 14 जुलै 2026) तालुका क्रीडा संकुल, मूर्तिजापूर येथे सकाळी 10.30 ते 12.30 या वेळेत दंगा काबू योजना (Mob Drill) अंतर्गत रंगीत तालीम घेण्यात आली.
या सरावामध्ये मूर्तिजापूर उपविभागातील विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी व अंमलदारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यामध्ये मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन येथील 1 अधिकारी व 25 अंमलदार, मूर्तिजापूर ग्रामीण येथील 2 अधिकारी व 14 अंमलदार, बोरगाव मंजू येथील 1 अधिकारी व 7 अंमलदार, पिंजर येथील 1 अधिकारी व 10 अंमलदार, माना येथील 2 अधिकारी व 10 अंमलदार तसेच बार्शीटाकळी येथील 2 अधिकारी व 14 अंमलदार अशा एकूण 9 अधिकारी व 80 पोलीस अंमलदारांनी पुरुष व महिला कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.
रंगीत तालीमेदरम्यान दंगल नियंत्रण, जमाव पांगविणे, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा प्रत्यक्ष सराव करण्यात आला. यावेळी 5 टी.एस. सेल अम्युनिशन खर्ची करण्यात आले. तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय, मूर्तिजापूर येथील ॲम्बुलन्ससह वैद्यकीय चमू तसेच अग्निशमन दलाची गाडी देखील घटनास्थळी सज्ज ठेवण्यात आली.
या रंगीत तालीमेमुळे आगामी सण-उत्सवांच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. नागरिकांनीही सण-उत्सव शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

No comments:
Post a Comment