ग्रामस्थांचे निवेदन, गुन्हा दाखल करण्याची मागणी
प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी
कळमनुरी, तालुक्यातील गौळ बाजार येथे जलजीवनअंतर्गत गुत्तेदाराने काम न करता जवळपास ५० टक्के रक्कम उचलली. काम पूर्ण न करता शासकीय रक्कमेचा अपहार करण्यात आल्याचा आरोप करीत गुत्तेदाराविरुद्ध कार्यवाही करावी अन्यथा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला.
गौळ बाजार येथे जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत २०२१-२२ व २०२२-२३ साली पिण्याच्या पाण्यासाठी १ कोटी ७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. संबंधित गुत्तेदाराने आत्तापर्यंत थातूर-मातूर पद्धतीने व बोगस काम करीत अवघ्या गावाचे रोड फोडून पाईपलाईन टाकली तर अद्यापपर्यंत विहीर व टाकी कामाचा पत्ता नाही तरी पण अधिकाऱ्यांच्या संगनमताने ५६ लाखांची देयके उचलही करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. अनेक वेळा तक्रारी निवेदन देऊनही सदर काम पूर्ण करण्यात येत नाही. त्यामुळे गाव अद्यापही तहानलेलाच राहिला आहे. अर्धवट टाकलेल्या पाईपलाईनमुळे रहादारीसही अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे गावाकऱ्यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन देत सदर काम चांगल्या दर्जाचे व लवकर करून देणे तसेच कामात बोगसपणा व हलगर्जीपणा करणाऱ्या गुत्तेदारावर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा उपोषण रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.

No comments:
Post a Comment