सोनई मध्ये विजेच्या धक्क्याने 10 वर्षीय बालकाचा मृत्यू.
दर्पण न्यूज (नेवासा प्रतिनिधी) _नवनाथ घावटे सोनई.
सोनई शहरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी दुर्घटनेत ईश्वर राहुल वैरागर (वय अंदाजे 10 वर्षे), इयत्ता चौथीत शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण सोनई शहरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिर परिसरात सुरू असलेल्या बांधकामस्थळी उभारलेल्या लोखंडी मचानामध्ये वीजप्रवाह उतरल्याने हा अपघात घडला. या अपघातात निष्पाप ईश्वर ला आपला जीव गमवावा लागला. एका निष्पाप बालकाचा असा अकाली मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र दुःख आणि संतापाची भावना व्यक्त होत आहे.
निष्काळजीपणा, सुरक्षेचा अभाव किंवा इतर कोणत्याही कारणामुळे एका निरागस जीवाचा बळी जाणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. आपल्या डोळ्यांसमोर काळजाचा तुकडा कायमचा निघून गेल्याचे दुःख वैरागर कुटुंबावर कोसळले आहे. हे दुःख शब्दांत व्यक्त करणे अशक्य असून संपूर्ण गाव त्यांच्या दुःखात सहभागी झाले आहे.
ईश्वर चे वडील राहुल वैरागर हे अत्यंत मेहनती व आर्थिकदृष्ट्या सामान्य कुटुंबातील व्यक्ती असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या दुर्घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अनेक नागरिकांनी त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले.
या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी सर्व बांधकामस्थळी आवश्यक सुरक्षा उपाययोजना आणि विद्युत सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

No comments:
Post a Comment