विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत २५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप



 प्रतिनिधी : मोहसीन इनामदार , जत 

 ओम साई प्रतिष्ठान, शेगाव यांच्या वतीने राबविण्यात येणारी "विद्यार्थी दत्तक योजना – वर्ष तिसरे" हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या उपक्रमांतर्गत गावातील २५ गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य डॉ. शिवाजी खिलारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते विक्रम भैया ढोणे, डॉ. संभाजी देशमुख, शेगाव सर्व सेवा सोसायटीचे चेअरमन धोंडीराम गुंडा माने, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी शिंदे, उपाध्यक्ष अनुराधा निकम, सुभेदार मेजर शिवाजी बोराडे, केंद्रप्रमुख शेंडे सर, मुख्याध्यापक कुलकर्णी सर, नवनाथ निकम, विशाल माने, धनाजी पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ओम साई प्रतिष्ठानचे सर्व संचालक, महिला कार्यकारिणी सदस्य, शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर यश संपादन करण्याचे आवाहन केले. तसेच मान्यवरांनी ओम साई प्रतिष्ठानच्या सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या विविध उपक्रमांचे कौतुक करत संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी राबविण्यात येणारी ही योजना कौतुकास्पद असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. संस्थेच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम समाजातील दानशूर व्यक्ती, देणगीदार व हितचिंतकांच्या सहकार्यामुळे यशस्वी झाला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही सुरू राहतील, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष बबलू शिंदे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, देणगीदार, पालक, शिक्षकवृंद व ग्रामस्थांचे ओम साई प्रतिष्ठानच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

No comments:

Post a Comment