निर्माणाधीन महामार्गावर धोक्याची सूचना देणारे फलक नसल्याने खापरदरीचे दुचाकीस्वार गंभीर जखमी.
*वैद्यकीय खर्चाची मागणी करणाऱ्या नातेवाईकांना कंपनी प्रशासनाने लावले हाकलून.*
मानोरा - पोहरादेवी धानोरा या निर्माणाधीन महार्गावरील सनगाव गावालगत असलेल्या एका प्लांटजवळ अंदाजे १०० ते २०० मीटर रस्ता अपूर्ण अवस्थेत असल्याने दुचाकी घसरून अपघात झाल्याची घटना दोन आठवड्यांपूर्वी घडून या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर उपचारासाठी मोठा खर्च झाल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खापरदरी येथील दिनेश जयसिंग राठोड हे बिबिशन घुट्टा राठोड (वय अंदाजे ६५) यांना घेऊन धानोरा येथून खापरदरीकडे जात होते.सनगाव परिसरातील सदर महामार्ग बांधकाम करीत असलेल्या कंपनीच्या प्लांटजवळ रस्ता अपूर्ण अवस्थेत असल्याने तयार झालेल्या भागावर दुचाकी चढविताना वाहन घसरल्याचे सांगितले जात आहे.
या अपघातात चालक दिनेश राठोड यांच्या गुडघ्याला दुखापत झाली, तर मागे बसलेले बिबिशन राठोड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून खांदा व कंबरेला फ्रॅक्चर झाले आहे. त्यांच्यावर अकोला येथे सुमारे १५ दिवस उपचार करण्यात आले. सध्या ते घरी उपचार घेत असून डॉक्टरांनी पुढील शस्त्रक्रियेची शक्यता व्यक्त केल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
तानंतर रुग्णालयातून सदर प्रकरणाची एम एल सी (मेडिको लीगल केस) नोंद संबंधित पोलीस यंत्रणेकडे पाठविण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान, जखमींच्या कुटुंबीयांनी तसेच गावातील नायक कारभारी व पोलीस पाटील यांनी संबंधित बांधकाम कंपनीच्या व्यवस्थापनाशी दोन वेळा संपर्क साधून मदतीची विनंती केल्याचे सांगितले.
कंपनीचे व्यवस्थापक सत्तेंद्र यादव यांनी अपघात ग्रस्त स्थानिक व्यक्तीच्या उपचारासाठी आर्थिक मदत देण्याची मागणी फेटाळत संबंधितांना घरचा रस्ता दाखविल्याने खापरदरी ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण झाला असून कंपनी प्रशासनाच्या अडेलतट्टू धोरणाविरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त करून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

No comments:
Post a Comment