टिटवी–पळसखेडा शेती रस्ता व पुलाच्या कामाला गती; दर्जेदार बांधकामामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान



वृत्ताची दखल घेत अभियंते व ठेकेदार सक्रिय; अंदाजपत्रकानुसार काम सुरू, पाहणीनंतर समाधानकारक प्रतिक्रिया


प्रतिनिधी सोयगाव दिलीप मोरे.

सोयगाव तालुक्यातील टिटवी–पळसखेडा परिसरात लघु पाटबंधारे विभागामार्फत सुरू असलेल्या रस्ता व पुलाच्या कामाबाबत काही दिवसांपूर्वी विविध स्तरांतून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत असताना प्रसारमाध्यमांतून वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित विभागाचे अभियंते व ठेकेदार यांनी तात्काळ दखल घेत कामात सुधारणा करत प्रत्यक्ष उपस्थित राहून अंदाजपत्रकातील तरतुदी व तांत्रिक निकषांनुसार काम सुरू केले आहे.

टिटवी गावातील अंतिम संस्कार भूमीजवळ सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामध्ये दर्जेदार साहित्याचा वापर करण्यात येत असून रस्त्याची उंची, रुंदी आणि लांबी यासंबंधी आवश्यक मानकांचे पालन केले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक शेतकरी व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून सध्या कामाबाबत कोणतीही ठोस तक्रार नसल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.

याच मार्गावरील पुलाच्या बांधकामातही गुणवत्तापूर्ण खडी, रेती व इतर साहित्याचा वापर होत असल्याने कामाचा दर्जा सुधारल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. रस्ता व पुलाचे हे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील सुमारे १०० ते १५० शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतूक, दळणवळण आणि शेतीसंबंधित कामांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी सुधारित कामाबद्दल समाधान व्यक्त करत हे काम पूर्ण झाल्यानंतर ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

दरम्यान, भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कार्यरत असलेल्या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीनंतर काम अंदाजपत्रकानुसार व समाधानकारक दर्जाने सुरू असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. तसेच कामात पारदर्शकता राखून गुणवत्तापूर्ण बांधकाम पूर्ण करण्याचे आवाहन संबंधित यंत्रणेला करण्यात आले.

No comments:

Post a Comment