म्हसळा एसटी स्थानक,ग्रामीण रुग्णालय परिसरात फेरीवाल्यांची अस्वच्छता,परिसर बनतो डंपिंग ग्राउंड ?
प्रवासी,रुग्ण व नागरिक त्रस्त,नगर पंचायतीने शिस्त लावण्याची मागणी'
म्हसळा शहरातील दिघी नाका येथील एसटी बस स्थानक व ग्रामीण रुग्णालय परिसरात खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या हातगाडी व्यावसायिकांच्या निष्काळजीपणामुळे परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.दिवसभर व्यवसाय केल्यानंतर सायंकाळी उशिरा हातगाडी चालक तेथून निघून जातात मात्र त्यांच्या व्यवसायातून निर्माण होणारा कचरा जागेवरच टाकून दिला जात असल्याने परिसराचे रूपांतर अक्षरशःमिनी डंपिंग ग्राउंडमध्ये होत असते.
खाद्यपदार्थांच्या वापरातील कागदी व प्लास्टिक डिश,ग्लास,चमचे, पिशव्या तसेच खरकटे अन्नपदार्थ यांचा ढिगारा सकाळी परिसरात सर्वत्र विखुरलेला दिसून येतो. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांचाही परिसरात वावर वाढतो. याचा फटका एसटी प्रवासी,रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बसत आहे.एसटी स्थानक व ग्रामीण रुग्णालय हा तालुक्यातील अत्यंत वर्दळीचा भाग मानला जातो.या परिसरातील वाढत्या घाणीमुळे स्वच्छतेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण झाला असून सार्वजनिक आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
हातगाडी व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायातून निर्माण होणारा कचरा स्वतः गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी,तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी म्हसळा नगर पंचायतीकडे केली आहे.नगर पंचायत सफाई कर्मचारी रोज सकाळी ९ ते १० वाजे पर्यंत साफसफाई करीत असतात तो पर्यंत नागरिकांना विखुरलेल्या कचऱ्याचा त्रास होत असतो.
स्वच्छ शहराचा दर्जा टिकवायचा असेल तर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कठोर निर्बंध घालणे काळाची गरज असल्याचे मतही नागरिकांनी व्यक्त केले आहे. व्यवसाय करा पण स्वच्छतेची जबाबदारीही घ्या !
एसटी स्थानक आणि ग्रामीण रुग्णालय परिसर हा तालुक्याचा चेहरा मानला जातो.त्यामुळे येथील स्वच्छता राखणे ही केवळ नगर पंचायतीचीच नव्हे तर व्यावसायिकांचीही सामूहिक जबाबदारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

No comments:
Post a Comment