हजरत बाबा ताजुद्दीन रहमतुल्लाह अलैह यांचा २६ वा उर्स १३ जून रोजी
ताजबाग दर्ग्यात विविध धार्मिक कार्यक्रम; भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
(नागपूर प्रतिनिधी : निलेश काळे)
हजरत बाबा सय्यद मुहम्मद ताजुद्दीन रहमतुल्लाह अलैह यांचा २६ वा उर्स शनिवार, १३ जून रोजी ताजबाग दर्गा परिसरात श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने नागपूरसह देशाच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने अकीदतमंद आणि भाविक ताजबाग येथे दाखल होण्याची शक्यता आहे.
उर्सानिमित्त कार्यक्रमांची सुरुवात सकाळी ८.३० वाजता हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट कार्यालयात पारंपरिक दस्तारबंदीच्या विधीने होईल. त्यानंतर शमा महफिल आयोजित करण्यात येईल. सकाळी ९ वाजता दर्गा परिसरात भाविकांच्या उपस्थितीत परचम कुशाईची रस्म पार पडेल. यानंतर सलातो-सलाम पठण करण्यात येईल तसेच जागतिक शांतता, बंधुता, सौहार्द आणि समृद्धीसाठी विशेष दुआ करण्यात येणार आहे.
हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टतर्फे दिवसभर विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दर्गा परिसरातील लंगरखान्यात भाविकांसाठी महाप्रसाद (लंगर) वितरणाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
सायंकाळी दर्गा परिसरात शमा महफिल, मिलाद शरीफ तसेच सूफी कव्वालीचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी देशातील नामवंत नातख्वान आणि कव्वाल आपल्या सादरीकरणातून भाविकांना आध्यात्मिक आणि भक्तिमय वातावरणाचा अनुभव देणार आहेत.
हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे अध्यक्ष श्री. प्यारे जिया खान, सचिव श्री. ताज अहमद राजा, उपाध्यक्ष डॉ. सुरेंद्र जिचकार तसेच विश्वस्त हाजी फारुखभाई बावला, गजेंद्रपाल सिंह लोहिया, मुस्तफाभाई टोपीवाला आणि हाजी इमरान खान ताजी यांच्यासह हजरत बाबा ताजुद्दीन दर्गा खुद्दाम समितीचे अध्यक्ष सय्यद मोबीन खान ताजी यांनी सर्व भाविक आणि अकीदतमंदांना मोठ्या संख्येने उर्सात सहभागी होऊन बाबांच्या दरबाराची बरकत प्राप्त करण्याचे आवाहन केले आहे.

No comments:
Post a Comment