पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करून वृक्षसंवर्धनाचा घेतला संकल्प; ग्रामस्थांना पर्यावरण संरक्षणाचे आवाहन

 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्री क्षेत्र चाकरवाडीत वृक्षारोपण; तहसीलदार शेळके यांच्या हस्ते हरित उपक्रम




प्रतिनिधी सोयगाव दिलीप मोरे..

चाकरवाडी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्री क्षेत्र चाकरवाडी येथील ज्ञानेश्वर माऊली महाराज संस्थान परिसरात वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धन, हरित क्षेत्रात वाढ आणि भावी पिढ्यांना निरोगी व समृद्ध पर्यावरणाचा वारसा मिळावा या उद्देशाने आयोजित कार्यक्रमात बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या हस्ते विविध पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली.

यावेळी गावरान आंबा, गावरान चिंच, पिंपळ, कडुलिंब आदी पर्यावरणासाठी उपयुक्त आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. वाढते तापमान, अनियमित पर्जन्यमान, भूजल पातळीतील घट आणि जागतिक तापमानवाढ यांसारख्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी वृक्षारोपण हा प्रभावी उपाय असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमास बाळनाथ माऊली संस्थानचे ह.भ.प. महादेव महाराज (तात्या), मंडळ अधिकारी दिपाली आघाव, ग्राम महसूल अधिकारी प्रदीप गर्जे, प्रशांत नलावडे, निखिल राऊत, ग्राम पंचायत अधिकारी रमेश सानप, विलास काकडे, पोलिस पाटील मीरा काकडे, माजी पोलिस पाटील नानासाहेब काकडे, सरपंच विनोद कवडे, उपसरपंच लखन अनवने, ज्ञानोबा अनवने, मानचिक पवार, बापू पवार, गणेश पवार, मिथुन पवार, प्रशांत अनवाने, धम्मदीप वंजारे, हनुमंत चाळक, नवनाथ काकडे, मुन्ना शेळके, राजाभाऊ शेळके, पत्रकार अभिजित पवार, दिपक अनवाने, जीवन अनवाने, महादेव हजारे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, ग्रामस्थ आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार चंद्रकांत शेळके म्हणाले, "आज संपूर्ण जग वाढत्या उष्णतेने त्रस्त आहे. बदलते हवामान, अवेळी पडणारा पाऊस आणि जागतिक तापमानवाढ यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. अशा परिस्थितीत अधिकाधिक वृक्ष लागवड करणे आणि त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे. आपण आज लावलेले झाड उद्याच्या पिढीसाठी जीवनदायी ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगविण्याचा संकल्प करावा."

ह.भ.प. महादेव महाराज (तात्या) यांनीही आपल्या मनोगतात वृक्षारोपणाच्या उपक्रमाचे कौतुक करत पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले.विशेष म्हणजे, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी लागवड करण्यात आलेल्या सर्व वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारत त्यांच्यावर नियमित लक्ष ठेवणार असल्याचे सांगितले. तसेच उपस्थित ग्रामस्थांना वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून देत पर्यावरण संरक्षणासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

या उपक्रमामुळे परिसरात पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती निर्माण झाली असून "वृक्ष लावा, वृक्ष जगवा" हा संदेश प्रभावीपणे पोहोचला. श्री क्षेत्र चाकरवाडी येथे झालेला हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

No comments:

Post a Comment