जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा, आजनी येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण



(तालुका प्रतिनिधी : निलेश काळे)

नागपूर ग्रामीण - आजनी, दि. ५ जून २०२६: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा, आजनी येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत आजनीचे उपसरपंच श्री. ब्रिजलालजी उपराडे होते. प्रमुख अतिथी म्हणून रामटेक तालुका कुस्ती संघाचे सचिव तथा उत्कृष्ट क्रीडा शिक्षक श्री. सुभाष चव्हाण व एडुसन  फाऊंडेशनचे संचालक निलेश काळे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री. सुभाष चव्हाण यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच पर्यावरण विषयक गीत सादर करून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण केली.

याप्रसंगी सुप्रसिद्ध साहित्यिक तथा शाळेतील शिक्षक  एन. के. राठोड यांनी पर्यावरणावर आधारित स्वतःची रचना असलेली प्रभावी कविता सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक शिक्षक डी. के. राठोड यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका सौ. अनिता चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. चंद्रकिरण दमाहे, ग्रामपंचायत सचिव बांडेबुचे, गावातील नागरिक, पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाविषयी जनजागृती होऊन सकारात्मक संदेश पोहोचला.

No comments:

Post a Comment