दिल्ली पब्लिक स्कूल, वाडी येथे पॉक्सो कायदा व बाल संरक्षण विषयक शिक्षक कार्यशाळा संपन्न



(प्रतिनिधी : निलेश काळे)

नागपूर, दि. 04 जून 2026 : दिल्ली पब्लिक स्कूल, वाडी, नागपूर येथे आज पॉक्सो (POCSO) कायदा, बालकांचे अधिकार व बाल संरक्षण या विषयावर शिक्षकांसाठी विशेष जनजागृती व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

कार्यशाळेमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांनी बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO Act), बाल संरक्षण यंत्रणा, बालकांच्या सुरक्षिततेसाठी शैक्षणिक संस्थांची जबाबदारी तसेच संशयित घटनांमध्ये त्वरित तक्रार नोंदविण्याचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषद नागपूरचे जिल्हा बालरक्षक समन्वयक प्रसेंजित गायकवाड यांनी बाल संरक्षण समित्यांचे कार्य, बालकांच्या हक्कांचे संरक्षण व शाळा स्तरावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत माहिती दिली. तसेच बाल संरक्षण अधिकारी साधना हटवार यांनी बालकांच्या मानसिक, सामाजिक व भावनिक संरक्षणासाठी शिक्षकांची भूमिका स्पष्ट केली.

कायदे विषयक मार्गदर्शन करताना ॲडव्होकेट समीना काश्मी यांनी पॉक्सो कायद्याच्या विविध तरतुदी, बालकांच्या हिताचे संरक्षण, तक्रार प्रक्रिया व कायदेशीर जबाबदाऱ्या याविषयी उपस्थितांना माहिती दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिल्ली पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरक्षित, संवेदनशील व बालमैत्रीपूर्ण शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी अशा कार्यशाळांचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यशाळेदरम्यान शिक्षकांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. बालकांचे हक्क, सुरक्षा, संरक्षण, सायबर गुन्ह्यांपासून बचाव, लैंगिक अत्याचार प्रतिबंध आणि शाळांमधील सुरक्षित वातावरण निर्मिती या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी अशा उपक्रमांचे नियमित आयोजन करण्याची आवश्यकता व्यक्त केली. बालकांच्या संरक्षणासाठी शाळा, पालक, समाज व प्रशासन यांच्यात प्रभावी समन्वय निर्माण करण्याचा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला.


No comments:

Post a Comment