१०९ ग्रामपंचायतींची १२ जूनला होणार आरक्षण सोडत
प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी
कळमनुरी, राज्य निवडणूक आयोगाकडून २०२४-२५ मध्ये मुदत संपलेल्या व २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नवनिर्मित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ग्रामपंचायत सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला असून कळमनुरी तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत १२ जून रोजी नियुक्त अध्यासी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे विविध आदेश आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील सुधारणांनुसार, नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित जागा एकूण जागांच्या २७टक्क्यांपर्यंत तसेच, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांचे एकत्रित एकूण आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असणार नाही, याची काटेकोर अंमलबजावणी या सोडतीत केली जाणार आहे. पूर्वी जाहीर झालेल्या काही अधिसूचना रद्द करून आता या नवीन नियमानुसार संपूर्ण प्रक्रिया नव्याने राबवली जात आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ८ जून रोजी आरक्षण सोडत काढण्यासाठी विशेष ग्रामसभेची
(नमुना ब) नोटीस, सूचना जारी केली जाईल, तर १२ जून रोजी तहसीलदार जिवककुमार कांबळे यांनी प्राधिकृत केलेल्या अध्यासी अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा बोलावून प्रत्यक्ष आरक्षणाची सोडत काढली जाणार असून १७ जून ला प्रभागनिहाय आरक्षण प्रारूप अधिसूचनेस जिल्हाधिकारी मान्यता देतील, १९ जून ला प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप जाहीर केले जाईल. तसेच १९ जून ते २५ जून या कालावधीत नागरिकांना आरक्षणावर आपल्या हरकती आणि सूचना तहसील कार्यालय कळमनुरी येथे दाखल करता येतील. ३ जुलै रोजी प्राप्त झालेल्या हरकतींवर उपविभागीय अधिकारी आपला अंतिम अभिप्राय नोंदवतील. ८ जुलै रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अभिप्रायानंतर जिल्हाधिकारी अंतिम अधिसूचनेस (नमुना अ) मंजुरी देतील. १० जुलै जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिलेल्या अंतिम प्रभाग रचनेला आणि आर-क्षणाला व्यापक प्रसिद्धी दिली जाईल. दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीची तयारीची पहिली पायरी असलेल्या आरक्षण सोडत कार्यक्रमास इच्छुक ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहन तहसीलदार जिवककुमार कांबळे यांनी केले.

No comments:
Post a Comment