खोटे भाडे करारनामे सादर करून शासनाची फसवणूक; चिखली कोरेगावच्या ग्रामसेवकावर गंभीर आरोप!
दर्पण न्यूज (श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी)
चिखली कोरेगाव (ता. श्रीगोंदा) येथील ग्रामसेवक तानाजी सोनबा पानसरे यांनी मुख्यालयी न राहता बनावट भाडे करारनामे सादर करून शासनाकडून घरभाडे भत्ता लाटल्या बाबत चिखली येथील माजी सैनिक महेश भिवसेन झेंडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारी मध्ये असे म्हटले आहे कि ग्रामसेवक पानसरे हे २०२२ ते २०२६ या काळात चिखली कोरेगाव येथे मुख्यालयी न राहता श्रीगोंदा येथील पेडगाव येथे राहत होते. तरीही पण चिखली कोरेगाव येथे राहत असल्याचे दाखवून त्यांनी दरवर्षी खोटे भाडे करारनामे सादर करून शासन तिजोरीतून घरभाड्याची रक्कम लाटली आहे . या भ्रष्टाचाराबाबत जाब विचारला असता, सरपंचांशी संगनमत करून तक्रारदाराला खोट्या प्रकरणात अडकवण्याची व अतिक्रमण पाडण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या तक्रारीची दखल घेत जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी श्रीगोंदा गटविकास अधिकाऱ्यांना तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या आठ दिवसांत ग्रामसेवकावर निलंबन व फौजदारी कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा माजी सैनिक महेश झेंडे यांनी दिला आहे.

No comments:
Post a Comment