गुरुवंदनेने दुमदुमले पळसदेव येथील एल. जी. बनसुडे विद्यालय; गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी — शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सन्मान
दर्पण न्यूज इंदापूर तालुका प्रतिनिधी :- अंकुश भोसले
पळसदेव (ता. इंदापूर) — गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल. जी. बनसुडे इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, पळसदेव येथे गुरुपौर्णिमा भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. विद्यालयाच्या मुख्य प्रांगणात पारंपरिक रीतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शिक्षण, संस्कार व गुरु-शिष्य परंपरेला महत्त्व देणारे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री. हनुमंत (नाना) बनसुडे होते, तर प्रमुख पाहुणे मेजर श्री. विठ्ठल शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाला संस्थेच्या सचिव व कार्याध्यक्षा सौ. नंदाताई (नानी) बनसुडे, सचिव श्री. सुरज बनसुडे, विश्वस्त श्री. दर्शन बनसुडे, श्री. हनुमंत (आप्पा) मोरे, प्राचार्य श्री. संजय इंगोले, मुख्याध्यापिका सौ. सीमा बाराते, उपमुख्याध्यापिका सौ. सुवर्णा वाघमोडे, पालक प्रतिनिधी श्री. आकाश नगरे, सर्व विभागप्रमुख, शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय श्री. हनुमंत (नाना) बनसुडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाली. दीपप्रज्वलनानंतर विद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी गुरुंच्या महत्त्वावर भाषणे, मनोगते, कविता, नृत्य आणि सांस्कृतिक नाट्य प्रकार सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. विद्यार्थ्यांच्या भावनिक व सुशिक्षित सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
या वेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच वाहनचालक व वाहनमालक यांचा गुलाबपुष्प व पेन देऊन सन्मान करण्यात आला. शिक्षिका सौ. राजुली जाधव यांनी "आधी गुरुसी वंदावे, मग साधन साधावे" या संतवचनाचा उल्लेख करत गुरुंच्या महान कार्याचे स्मरण केले आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव व्यक्त केला.
अध्यक्षीय भाषणात श्री. हनुमंत (नाना) बनसुडे यांनी म्हणाले की, "गुरु हे केवळ ज्ञानाचे वाहक नसून संस्कारांचे मूळ देखील आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने गुरूंचा आदर ठेवला पाहिजे आणि ज्ञान प्राप्त करण्यास सदैव उत्सुक राहावे." त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील सातत्य, नीतिमत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला.
प्राचार्य श्री. संजय इंगोले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत गुरुपौर्णिमेच्या परंपरेचे सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून घडवल्या जाणाऱ्या सर्जनशील कार्यक्रमांचे कौतुक केले आणि शाळेची शैक्षणिक प्रगती व स्थानिक समुदायाशी असलेली नाळ याबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ज्योती मारकड व श्री. प्रकाश दरदरे यांनी प्रभावीपणे केले, तर सौ. विद्या पोटे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल विश्वस्त मंडळ, पालकवर्ग व उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्य व शिक्षकांचे कौतुक केले आणि शाळेच्या पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्याद्वारे ज्ञान, संस्कार व गुरु-शिष्य परंपरेचा गौरव राखण्याचा संदेश देण्यात आला, असा विश्वास कार्यक्रमाचे आयोजकांनी व्यक्त केला. उपस्थितांनी या प्रकारचे सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रम मार्गस्थ करण्यासाठी शाळा प्रशासनाचे कौतुक केले.

No comments:
Post a Comment