राजस्थानातून आलेल्या बोगस जिप्समचा कळमनुरीतील मसोड येथे पर्दाफाश



कृषी विभागाच्या सतर्कतेमुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळली

प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी 

कळमनुरी खरीप हंगाम तोंडावर येत असतानाच बोगस खत विक्रीच्या रॅकेटवर कृषी विभागाने शनिवारी (दि.१६ मे २०२६) कळमनुरी तालुक्यातील मसोड येथे मोठी कारवाई केली. राजस्थानातून आलेल्या एका ट्रकमधून सुमारे दीड लाख रुपये किमतीची ६९० जिप्सम खताची पोती जप्त करण्यात आली. कृषी विभागाच्या तत्पर कारवाईमुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक टळली आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी बोगस निविष्ठा विक्री रोखण्यासाठी कठोर सूचना दिल्यानंतर कृषी विभाग ऍक्शन मोड मध्ये आला आहे. तसेच पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनीही तातडीने पोलीस मदत उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. शनिवारी दुपारी मसोड येथे ट्रकमधून शेतकऱ्यांना जिप्सम खताची विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती कृषी विकास अधिकारी अतुल वायसे यांना मिळाली. त्यानंतर कृषी अधिकारी पंकज राठोड,

जिल्हा कृषी विकास अधिकारी अतुल वायसे, प्रदीप राठोड यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत ट्रकची तपासणी केली. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये जिप्सम खताचा मोठा साठा आढळून आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कळमनुरी पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे यांच्या पथकाला घटनास्थळी रवाना करण्यात आले. पोलिसांनी ट्रकसह जिप्सम खताची ६९० पोती ताब्यात घेऊन कळमनुरी पोलीस ठाण्यात जमा केली आहेत. कृषी विभागाच्या माहितीनुसार, जिप्सम हे अधिकृत खत नसून त्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक केली जात होती. वेळीच कारवाई झाल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टळले आहे. याप्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्ह्यात बोगस खत व बियाणे विक्री करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.


No comments:

Post a Comment