महाड : ऐतिहासिक चवदार तळे स्वच्छतेसाठी गाळ उपसा मोहीम सुरू

 


संभाजीराव सूर्यवंशी (तालुका प्रतिनिधी)

महाड (प्रतिनिधी) : शहरातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या चवदार तळ्याच्या स्वच्छतेसाठी नगरपालिका प्रशासनाने गाळ उपसा व साफसफाईची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. तळ्यात साचलेला मोठ्या प्रमाणातील गाळ, कचरा आणि दूषित पाणी यामुळे तळ्याचे सौंदर्य व पाणी साठवण क्षमता कमी झाली होती. याच पार्श्वभूमीवर ही मोहीम राबविण्यात येत आहे.

सदर कामांतर्गत तळ्याचे पाणी मोठ्या प्रमाणावर कमी करून यंत्रांच्या साहाय्याने तळातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. तसेच परिसरातील सांडपाणी, प्लास्टिक कचरा आणि अतिक्रमणांवरही कारवाई केली जात आहे. नागरिकांनीही या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चवदार तळे हे महाड सत्याग्रह मुळे ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे या तळ्याचे जतन व संवर्धन करणे ही प्रशासनासह नागरिकांची सामूहिक जबाबदारी असल्याचे मत व्यक्त होत आहे.

नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाळ उपसा पूर्ण झाल्यानंतर तळ्याभोवती सुशोभीकरण, पायवाट दुरुस्ती आणि प्रकाशयोजना करण्याचाही प्रस्ताव आहे. यामुळे भविष्यात तळे पर्यटनस्थळ म्हणूनही विकसित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, नागरिकांनी तळ्यात कचरा टाकू नये, स्वच्छता राखावी आणि प्रशासनाच्या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment