गावातील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर युवा पत्रकार प्रतीक्षा गजभिये यांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून पाण्याची वास्तविक स्थिती तपासली.



 दर्यापूर -प्रतिनिधी -दिपक मेश्राम                                

लेहेगाव (रेल्वे) ता. दर्यापूर येथे गेल्या महिनाभरापासून तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे. वाढत्या उन्हामुळे तापमान ४५ ते ४६ अंशांपर्यंत पोहोचल्याने नागरिकांसह जनावरांनाही पाण्याची टंचाई भासत आहे.

सध्या गावात एकच पाण्याची टाकी कार्यरत असून, उन्हाळ्यात वाढलेल्या मागणीमुळे संपूर्ण गावाला पुरवठा करणे कठीण झाले आहे. नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण झाले असून तिचे उद्घाटन तातडीने करावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

दरम्यान, वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी पत्रकार प्रतीक्षा गजभिये यांनी टाकीची प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांच्या शंकांना उत्तर मिळवण्यासाठी त्यांनी टाकीवर चढून पाण्याची पातळी तपासली. टाकीत पाण्याचे प्रमाण असल्याचे दिसून आल्याने पाणीटंचाईमागील कारणांचा शोध घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले.

टाकीवर चढल्यानंतर काही काळ वाऱ्याचा वेग अधिक असल्याने खाली उतरण्यास विलंब झाला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र, काही वेळानंतर त्या सुरक्षितपणे खाली उतरल्या.

ही कृती कोणताही स्टंट नसून, नागरिकांच्या समस्येचा प्रत्यक्ष आढावा घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “पत्रकारितेचा उद्देश केवळ बातमी देणे नसून, समस्यांचा मूळ शोध घेऊन त्यावर उपाययोजना व्हावी यासाठी प्रयत्न करणे हा आहे,” असे त्या म्हणाल्या.

या घटनेमुळे पाणीपुरवठा व्यवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे

No comments:

Post a Comment