१९ वर्षांच्या निष्कलंक सेवेला दाद! सहायक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांना DG Police Medal ने गौरव

 


सोयगाव प्रतिनिधी.. दिलीप मोरे...

पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ व धडाडीचे अधिकारी म्हणून ओळख असलेले सहायक पोलीस निरीक्षक श्री. भरत उत्तम मोरे यांना त्यांच्या उत्कृष्ट व निष्कलंक सेवेसाठी दिनांक १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकांकडून “DG Police Medal/Insignia” या मानाच्या सन्मानचिन्हाने गौरविण्यात आले आहे।

दि. १३ जून २००६ रोजी पोलीस सेवेत दाखल झालेल्या मोरे यांनी आजपर्यंत तब्बल १९ वर्षे १० महिने १७ दिवस सेवा पूर्ण केली आहे। या कालावधीत त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा, श्रीगोंदा, कोपरगाव शहर, धुळे जिल्ह्यातील धुळे शहर, बीड जिल्ह्यातील आष्टी व कडा दुरक्षेत्र तसेच छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यातील फर्दापूर व शिवूर पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे। सध्या ते पोलीस अधीक्षक यांचे वाचक म्हणून कार्यरत आहेत।

मोरे यांनी आपल्या सेवाकाळात ३०० हून अधिक गुन्ह्यांचा तपास यशस्वीपणे पूर्ण केला असून त्यामध्ये ९ गंभीर खून प्रकरणांचा समावेश आहे। शिवूर पोलीस ठाण्यात प्रभारी असताना एटीएम चोरी प्रकरणातील पाच राज्यांमध्ये फरार असलेल्या अट्टल गुन्हेगारास एटीएम मशीन व १५ लाख २० हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह अटक करण्याची धाडसी कामगिरी त्यांनी बजावली। तसेच कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना नागपूर येथून अट्टल घरफोड्या आरोपीस अटक करून मध्यप्रदेशातील देवास येथे जाऊन सुमारे ५० तोळे सोने हस्तगत करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली।

त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत सेवाकाळात त्यांना तब्बल ३११ बक्षिसे व ११ प्रशंसापत्रे प्राप्त झाली आहेत। मागील जवळपास दोन दशकांच्या सेवेतील प्रामाणिकपणा, शिस्तबद्ध कामकाज व गुन्हे उघडकीस आणण्यातील सातत्यपूर्ण यश यामुळेच त्यांना हा मानाचा DG Police Medal प्रदान करण्यात आला आहे।

मोरे यांच्या या यशामुळे पोलीस दलात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या पुढील सेवेसाठी सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे।


No comments:

Post a Comment