कृषी सेवा केन्दाचा राज्यव्यापी बेमुदत बंद :-अनसिंग येथे उत्स्फूर्त प्रतिसाद




अनसिंग (ता. २७) : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स अँड सीड्स डीलर्स असोसिएशन, पुणे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार (ता. २७) पासून बेमुदत बंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. या आंदोलनाला अनसिंग येथील सर्व कृषी सेवा केंद्रांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत दुकाने पूर्णतः बंद ठेवली.

राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांना गेल्या काही वर्षांपासून विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्यांबाबत विक्रेत्यांनी कृषी विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला; मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने असोसिएशनने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. विक्रेत्यांच्या मागण्यांमध्ये परवाना प्रक्रिया सुलभ करणे, नियमांमध्ये सुसंगती आणणे, तसेच विविध शासकीय अटींमध्ये सुधारणा करणे आदी मुद्द्यांचा समावेश असल्याचे समजते.

अनसिंग परिसरातील सर्व कृषी सेवा केंद्रांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवून आपली दुकाने बंद ठेवली. त्यामुळे स्थानिक तसेच परिसरातील शेतकऱ्यांना खत, बियाणे आणि कीटकनाशकांच्या उपलब्धतेवर तात्पुरता परिणाम झाला आहे. सध्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतीकामांना वेग आला असताना कृषी निविष्ठांची अचानक टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

या आंदोलनाचा परिणाम केवळ अनसिंगपुरताच मर्यादित न राहता राज्यातील अनेक भागांमध्ये जाणवत असून, कृषी क्षेत्रावर त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment