रुई - खेडलेझुंगे बोरमाथा रस्त्याच्या कामात अडथळे
अडथळे दूर न झाल्यास शेतकऱ्यांचा विष प्राशन करून सामुदायिक आत्मदहनाचा इशारा
प्रतिनिधी :- गणेश ठाकरे लासलगाव
निफाड तालुक्यातील रुई येथील जुना रुई - खेडलेझुंगे बोरमाथा रस्त्याच्या कामात अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासनाला अंतिम इशारा दिला आहे. संबंधितांवर तातडीने कारवाई न झाल्यास दि. ४ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर विष प्राशन करून सामुदायिक आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
रामदास दगू तासकर व इतर शेतकऱ्यांनी तहसीलदार तथा उपविभागीय पोलिस अधिकारी, निफाड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रुई येथील जिल्हा परिषद मार्ग क्रमांक २६६ अंतर्गत जुना रुई ते खेडलेझुंगे बोरमाथा हा दोन किलोमीटर रस्ता गेल्या वीस वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्थेत होता. या रस्त्यालगत ४० ते ५० घरांची वस्ती असून शेतमाल वाहतूक, विद्यार्थ्यांची ये - जा तसेच आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थांनी दि.१९ नोव्हेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर चार दिवसांचे आमरण उपोषण केले होते. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते व प्रशासनाने मध्यस्थी करून रस्त्याचे काम लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. पुढे दि.५ डिसेंबर २०२५ रोजी सरकारी मोजणी करण्यात आली, तर दि.२३ जानेवारी २०२६ रोजी हद्दी निश्चित करण्यात आल्या. त्यानंतर रस्त्याच्या कामास सुरुवात झाली. मात्र, काही शेतकरी आणि संबंधितांकडून ठेकेदार तसेच ग्रामस्थांवर खोटे आरोप करून कामात अडथळे आणले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यामुळे रस्त्याचे काम सध्या ठप्प झाले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून अडथळे दूर करावेत, अन्यथा दि.४ मे रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या प्रकरणात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.°
सदर शेतकऱ्यांची तक्रार प्राप्त झाली आहे. सदर रस्ता हा जिल्हा परिषद ई.व.द विभागाकडील रस्ता आहे त्यामुळे उपअभियंता पुरी साहेब यांना याबाबत कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. -विशाल नाईकवाडे तहसिलदार, निफाड

No comments:
Post a Comment