निफाड तालुक्यात एचपीव्ही लसीकरणाला अल्प प्रतिसाद



नागरिकांनी लाभ घ्यावा निफाड ग्रामीण रुग्णालय अधिक्षक राजीव तांभाळे यांचे आवाहन

प्रतिनिधी = गणेश ठाकरे लासलगाव  :- 

नाशिक जिल्ह्यात मानव पॅपिलोमा विषाणू एचपीव्ही लसीकरणाला जोरदार सुरुवात झाली आहे. मात्र, निफाड तालुक्यातील अवघ्या ५५० विद्यार्थिनींनी ही लस घेतल्याची माहिती निफाड ग्रामीण रुग्णालय अधिक्षक डॉ.राजीव तांभाळे यांनी दिली आहे. सदर आकडेवारीवरून निफाड तालुक्यात अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र समोर आले आहे. 

     एचपीव्ही हा एक सामान्य विषाणू असून तो त्वचा व श्लेष्मल त्वचेवर परिणाम करतो. काही प्रकारचे एचपीव्ही संसर्ग पुढे जाऊन गर्भाशय मुखाचा कर्करोग तसेच इतर काही कर्करोगांना कारणीभूत ठरू शकतात. या गंभीर आजारांपासून संरक्षण करण्यासाठी 

एचपीव्ही लस सुरक्षित व प्रभावी असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. ही लस विशेषतः ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी सर्वाधिक प्रभावी ठरते. (लैंगिक आयुष्य सुरू होण्यापूर्वी लसीकरण केल्यास जास्त संरक्षण मिळते.) काही परिस्थितीत मुलांनाही ही लस देणे उपयुक्त ठरते. लसीकरणामुळे गर्भाशय मुखाचा कर्करोग होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. त्यामुळे नागरिकांनी या लसीचा लाभ घ्यावा असे आवाहन राजीव तांभाळे यांनी केले आहे.


• लसीकरणासाठी पुढील तीन महिने कालावधी असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत आरोग्य संस्थांकडूनच माहिती घ्यावी आणि आपल्या मुलांचे वेळेत लसीकरण करून घ्यावे. मुलींचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि भविष्यातील गंभीर आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा. अधिक माहितीसाठी जवळच्या शासकीय रुग्णालय किंवा आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. राजीव तांभाळेवैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, निफाड


• एचपीव्ही लसीबाबत गैरसमज आणि सत्य गैरसमज - एचपीव्ही लस घेतल्याने वंध्यत्व येते

सत्य - या लसीचा वंध्यत्वाशी कोणताही संबंध नाही. ती पूर्णपणे सुरक्षित आहे.

गैरसमज - ही लस फक्त विवाहित महिलांसाठी आहे

सत्य - ही लस किशोरवयीन मुलींना (९–१४ वर्षे) देणे सर्वात फायदेशीर आहे.

गैरसमज - लस घेतल्याने वर्तन बिघडते

सत्य - लसीचा व्यक्तीच्या वर्तनावर कोणताही परिणाम होत नाही.

गैरसमज - एचपीव्ही संसर्ग दुर्मिळ आहे

सत्य - एचपीव्ही हा अतिशय सामान्य विषाणू असून अनेकांना आयुष्यात कधी ना कधी संसर्ग होऊ शकतो.


No comments:

Post a Comment