तहसील कार्यालय निफाडकडून प्रमाणपत्रे ‘हायटेक’; फोटो व द्रुत प्रतिसाद संकेतांकासह नवे स्वरूप लागू
प्रतिनिधी: - गणेश ठाकरे लासलगाव
नागरिकांना अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह सेवा देण्याच्या उद्देशाने तहसील कार्यालय निफाडकडून देण्यात येणाऱ्या विविध प्रमाणपत्रांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. यानुसार तहसील कार्यालयामार्फत मिळणारी सर्व प्रमाणपत्रे आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ‘हायटेक’ स्वरूपात उपलब्ध होणार आहेत.
तहसील कार्यालयाकडून मिळणाऱ्या प्रमाणपत्रांवर आता अर्जदाराचा फोटो तसेच द्रुत प्रतिसाद संकेतांक (QR कोड) अनिवार्य करण्यात येणार आहे. जात, उत्पन्न, रहिवासी, नॉन-क्रीमी लेयर यांसह विविध प्रकारच्या प्रमाणपत्रांसाठी हा बदल लागू राहणार आहे. या निर्णयामुळे प्रमाणपत्रांची सत्यता अधिक प्रभावीपणे तपासता येणार असून बनावट प्रमाणपत्रांच्या प्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे.
नव्या प्रणालीअंतर्गत प्रत्येक प्रमाणपत्रावर छापण्यात आलेला द्रुत प्रतिसाद संकेतांक स्कॅन केल्यास संबंधित प्रमाणपत्राची तत्काळ ऑनलाइन पडताळणी करता येणार आहे. त्यामुळे शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था तसेच इतर ठिकाणी प्रमाणपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभ व जलद होणार आहे. तसेच अर्जदाराचा फोटो समाविष्ट केल्यामुळे प्रमाणपत्रांचा गैरवापर टाळण्यास मदत होणार आहे. तहसील कार्यालय निफाडमार्फत सर्व नागरिकांनी या नव्या सुविधेचा लाभ घ्यावा तसेच प्रमाणपत्रांसाठी अर्ज करताना आवश्यक माहिती अचूक द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
• प्रमाणपत्रांवर द्रुत प्रतिसाद संकेतांक व अर्जदाराचा फोटो समाविष्ट केल्यामुळे बनावट प्रमाणपत्रांवर नियंत्रण मिळवता येईल. तसेच संकेतांक स्कॅन करून प्रमाणपत्राची तत्काळ पडताळणी करता येणार आहे. अर्जदारांचा मोबाईल नंबर जोडल्यामुळे अर्जाची सद्यस्थिती मोबाईलवर समजण्यास मदत होईल. यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल आणि सेवा अधिक सुलभ होईल.- विशाल नाईकवाडे तहसीलदार, निफाड

No comments:
Post a Comment