'म्हसळा नगरपंचायत सदस्य अनर्हता प्रकरणाला तात्पुरती स्थगिती,७ दिवसांत लेखी म्हणणे सादर करण्याचे निर्देश'
(वैभव कळस )
म्हसळा नगरपंचायती मधील सात सदस्यांच्या अनर्हता प्रकरणाला मोठे वळण मिळाले असून महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने जिल्हाधिकारी रायगड यांनी दिलेल्या अनर्हतेच्या आदेशास तात्पुरती स्थगिती दिली आहे. तसेच संबंधित सर्व पक्षकारांनी पुढील सात दिवसांत आपले लेखी म्हणणे सादर करावे,असे निर्देश देण्यात आले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार कमल रविंद्र जाधव यांच्यासह मेहजबीन नदिम दळवी, असहल असलम कादिरी,फरहीन अब्दुल अझीज बशारत,सुमैया कासम आमदानी,सारा अ.कादीर म्हसलाई व शाहिद सईद जंजिरकर या सात सदस्यांनी महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण अधिनियम, १९८६ मधील कलम ७(३)अन्वये जिल्हाधिकारी रायगड यांच्या दि. २७ जानेवारी २०२६ रोजीच्या आदेशाविरोधात दि.१२ फेब्रुवारी २०२६ रोजी शासनाकडे अपील दाखल केले होते.
या अपीलावर दि. २७ एप्रिल २०२६ रोजी सक्षम प्राधिकारी तथा मा.उपमुख्यमंत्री व नगर विकास मंत्री यांच्यासमोर सुनावणी पार पडली.सुनावणीनंतर संबंधित अपीलकर्ते,गैरअर्जदार तसेच जिल्हाधिकारी रायगड यांनी सात दिवसांच्या आत लेखी म्हणणे सादर करावे असे आदेश देण्यात आले.तसेच अंतिम निर्णय होईपर्यंत जिल्हाधिकारी रायगड यांनी दि.२७ जानेवारी २०२६ रोजी दिलेल्या आदेशास स्थगिती देण्यात आली असल्याने म्हसळा नगरपंचायतीतील राजकीय घडामोडींना नव्याने वेग आला आहे.या निर्णयामुळे म्हसळा नगरपंचायत परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले असून अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अनर्हता प्रकरणाला तात्पुरती स्थगिती मिळताच सदस्यांनी नगर पंचायत कार्यालयासमोर फटाके फोडून आपला आनंद साजरा केला.अनर्हता केलेले ७ नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य असून त्यांनी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला होता या प्रकरणाला तात्पुरती स्थगिती मिळाली असल्याने यातील सहा सदस्यांना अध्यक्ष पदाचे निवडणुकीत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दिनांक २७ जुलै रोजी नगर पंचायत नगराध्यक्ष पदाचे निवडणूक अर्ज दाखल करण्यात आले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक सुनिल शेडगे यांनी अर्ज दाखल केला असून त्यांचे विरोधात नगर सेवक शाहीद जंजिरकर आणि सुफीयान हळदे यांनी मुख्याधिकारी विठ्ठल राठोड यांच्या कडे नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.

No comments:
Post a Comment