कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामकाज ठप्प सकारात्मक प्रतिसाद मिळेपर्यंत आंदोलन कायम



प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी 

कळमनुरी राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्यात आला असून, या संपात कळमनुरी येथील तहसील कार्यालयातील राज्य महसूल कर्मचारी संघटनाही सक्रियपणे सहभागी झाली आहे. परिणामी, मंगळवारी तहसील कार्यालयातील दैनंदिन कामकाज पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाले,

कार्यालय परिसरात दिवसभर शुकशुकाट होता, तर नागरिकांना विविध कामांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली. या संपामध्ये माधव वाडीकर, प्रवीण सुरोशे, शंभुनाथ दुभळकर, अजिंक्य पंडित, संदीप आराळे, रवींद्र मस्के, अब्दुल जमील, संजय कौशल्य, संजय पाटील, सचिन इंगोले, रुखमाजी सातव, गणपत कदम, गजानन झुंजारे, वंदना टोकवार, दिगंबर संगेकर आदी कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग होता. कर्मचाऱ्यांनी एकत्र येत शासनाच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला.

कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करणे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालक भरतीवरील बंदी उठवणे, आश्वासित प्रगती योजनेचा लाभ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देणे,

सेवानिवृत्ती वय वाढवण्याचा मुद्दा ऐरणीवर


राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीचा २००५ पासूनचा आकृतीबंध तयार करणे, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, तसेच दीर्घकाळ सेवा देणाऱ्या कंत्राटी रोजदारी व अंशकालीन कर्मचाऱ्याऱ्यांना नियमित करणे यांचा समावेश आहे. याशिवाय, प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना अनुकंपा तत्वावर तातडीने नियुक्ती देण्याची मागणीही ठळकपणे करण्यात आली आंदोलक कर्मचा-यानी शासनाने त्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. सरकारकडून समाधानकारक प्रतिसाद मिळेपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतही प्रशासकीय कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, नागरिकांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.


No comments:

Post a Comment