अनसिंग येथील पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचार, निकृष्ट व अपूर्ण काम,




 

 प्रशासनाच्या निष्क्रियतेच्या विरोधात सामाजीक कार्यकर्ते यश चव्हाण यांचा उपोषणाचा इशारा

प्रतिनिधी नारायण सातव,अनसिंग. 

अनसिंग येथील पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचार, निकृष्ट व अपूर्ण काम, प्रशासनाच्या निष्क्रियतेच्या विरोधात सामाजीक कार्यकर्ते यश चव्हाण यांनी (ता.२७ ) एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा ( ता .२२ ) बुधवारी  जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

त्यांनी निवेदनात नमूद केले की, जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणारी पाणीपुरवठा योजना ही गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या कायमस्वरूपी प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ व सुरक्षित पाणी पोहोचवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असताना, प्रत्यक्षात अनसिंग येथे ही योजना संपूर्णपणे अपयशी ठरलेली असून यामध्ये कोट्यवधी रुपयांचा उघड भ्रष्टाचार झालेला आहे, ही वस्तुस्थिती आज सर्वांसमोर स्पष्टपणे दिसून येत आहे.सदर योजना सन २०२२ मध्ये सुरू करण्यात आली असून ती सन २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र आजतागायत ही योजना पूर्ण झालेली नाही. उलट अनेक ठिकाणी काम अपूर्ण अवस्थेत पडून आहे. योजनेसाठी तब्बल रुपये ८७३.७४ लक्ष इतका प्रचंड शासकीय निधी संबंधित कंत्राटदारास देण्यात आलेला असूनही प्रत्यक्षात कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असून मोठ्या प्रमाणावर अपूर्णता आढळून येत आहे. त्यामुळे हा संपूर्ण निधी कुठे व कसा खर्च झाला याबाबत गंभीर शंका असून प्रत्यक्ष भ्रष्टाचार झाल्याचा आरोपी त्यांनी केला आहे. 

अनेक वेळा अधिकार्‍यांनी लेखी आश्वासने दिली, काम पूर्ण करण्यासाठी ठराविक तारखा दिल्या; परंतु त्या सर्व आश्वासनांची जाणीवपूर्वक पायमल्ली करण्यात आली. (ता .१० ) जानेवारी २०२५ रोजी दिलेल्या लेखी आश्वासनानुसार ( ता.३१ )मार्च २०२५ पर्यंत काम पूर्ण करण्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर ( ता.२६ ) डिसेंबर २०२५ रोजी पुन्हा लेखी आश्वासन देऊन ( ता. ७ ) फेब्रुवारी २०२६ पासून पाणीपुरवठा सुरू करण्याचे नमूद करण्यात आले. परंतु आजपर्यंत कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. पाईपलाईन टाकताना कोणत्याही तांत्रिक नियमांचे पालन करण्यात आलेले नाही. अनेक ठिकाणी पाईपलाईनमध्ये लिकेज असून पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत आहे. काही ठिकाणी काम अपूर्ण असून काही ठिकाणी कागदोपत्री काम दाखवून प्रत्यक्षात कामच केलेले नाही. गावातील अनेक रस्ते खोदून ठेवण्यात आले असून त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही, ज्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.याशिवाय जुन्या पाणीपुरवठा लाईनचे नुकसान करण्यात आले असून त्यामुळे गावातील विद्यमान पाणीपुरवठा व्यवस्थाही कोलमडलेली आहे. परिणामी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. 

वरील सर्व बाबींचा सखोल विचार करता, ही योजना केवळ अपयशी ठरलेली नसून पूर्णपणे भ्रष्टाचाराचे जिवंत उदाहरण बनलेली आहे. पाणीपुरवठा योजनेची तात्काळ उच्चस्तरीय तांत्रिक व आर्थिक चौकशी करण्यात यावी. संबंधित कंत्राटदार  एस. बी. माहोरे यांना तात्काळ ब्लॅकलिस्ट करण्यात यावे. संबंधित अधिकारी व अभियंते यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी.अनसिंग गावात तात्काळ व नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी निश्चित कालमर्यादा जाहीर करण्याच्या मागणीसाठी अनसिंग येथील सर्व नागरिकांच्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी ( ता.२७ ) एप्रिल २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे आमरण उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.


No comments:

Post a Comment