तातडीच्या ग्रामसभेत दारूबंदीचा एकमताने ठराव; आदेश न पाळल्यास राज्य मार्गावर रास्ता रोकोचा इशारा
सोयगाव प्रतिनिधी...दिलीप मोरे..
तालुक्यातील नांदगाव तांडा येथे महिलांनी अवैध दारूविक्री आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात थेट रणशिंग फुंकत “बाटली आडवी” करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शुक्रवारी (दि.२४) तब्बल ८० महिलांनी एकत्र येत तातडीची ग्रामसभा बोलावून गावात संपूर्ण दारूबंदी लागू करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला.
गावात सुरू असलेल्या गावठी दारू, देशी दारू विक्री आणि पत्त्यांच्या तिरट क्लबमुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याचा तीव्र संताप महिलांनी व्यक्त केला. ग्रामसभेत नंदाबाई चव्हाण यांनी ठराव मांडला, तर शोभाबाई राठोड यांनी अनुमोदन दिले. यावेळी उपस्थित सर्व महिलांनी हात वर करून ठरावाला जोरदार पाठिंबा देत प्रशासनाला स्पष्ट संदेश दिला—“दारू बंद झालीच पाहिजे!”
महिलांनी केवळ ठरावापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरून गावालगतच्या ढाबे आणि हॉटेलवर थेट धडक दिली. दारूविक्री तात्काळ बंद करण्याच्या कडक सूचना देत त्यांनी विक्रेत्यांना इशारा दिला. या अचानक कारवाईमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी सहायक गटविकास अधिकारी अशोक दौड आणि ग्रामपंचायत अधिकारी सुवर्णा ननावरे उपस्थित होते. महिलांनी स्पष्ट इशारा दिला की, प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास सोयगाव–चाळीसगाव राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल, ज्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील.ग्रामसभेचा ठराव सोयगाव पोलीस ठाणे, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस अधीक्षक आणि पंचायत समितीकडे सादर करण्यात येणार आहे. आता प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
“दारू अड्ड्यांवर महिलांची थेट कारवाई”
ग्रामसभेनंतर महिलांनी ढाबे, हॉटेल आणि संशयित दारू अड्ड्यांवर अचानक धडक देत विक्री बंद करण्याचे आदेश दिले. “गाव बिघडवणारे धंदे खपवून घेतले जाणार नाहीत,” असा ठाम इशारा त्यांनी दिला.

No comments:
Post a Comment