सिडकोत तरुणाने स्वतःवर गोळी झाडल्याचा संशय; प्रकृती चिंताजनक, पोलिसांचा तपास सुरू


प्रति. पांडुरंग गायकवाड. दैनिक दर्पन..

छत्रपती संभाजीनगर : सिडको परिसरातील साई कृपा हौसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना   सायंकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.  समीर राजेंद्र नाईक (३४, रा. साई कृपा हौसिंग सोसायटी, एन-६) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर सध्या खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे यांनी ही माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, समीर हा पूजा-पाठ करून उदरनिर्वाह करत होता. शुक्रवारी सायंकाळी त्याची आई व भाऊ घराबाहेर गेले असताना त्याने घरातच गोळी झाडल्याचा संशय आहे. काही वेळाने आई घरी परतल्यानंतर समीर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. त्याच्या शेजारी पिस्तूलही पडलेले होते. आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेत त्याला तत्काळ रुग्णालयात हलवले.

दरम्यान, प्रथम जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला घाटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र नातेवाईकांच्या आग्रहास्तव पुढील उपचारासाठी त्याला पुन्हा एका खासगी दवाखान्यात हलवण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, समीरच्या डोक्यात गोळी लागली असून त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

घटनेची माहिती मिळताच सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घरातून गावठी कट्टा व रिकामे काडतूस जप्त करण्यात आले असून काही कागदपत्रे आणि डायरी ताब्यात घेण्यात आली आहे. रक्ताने माखलेली कागदपत्रे तपासासाठी फॉरेन्सिक विभागाकडे पाठवण्यात आली आहेत. या प्रकरणात वापरण्यात आलेली बंदूक नेमकी कुठून आली, तसेच घटनेमागील कारण काय याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून समीरच्या मित्रमंडळी व कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे... 

No comments:

Post a Comment