परीते सह 50 पेक्षा जास्त गावातील लोकांचे जोतिबा पुजारी विरोधात मूक मोर्चा...
भोगावती खोरा प्रतिनिधी...
"जोतिबाच्या नावानं चांगभलं"च्या जयघोषाने दुमदुमणाऱ्या वाडी रत्नागिरीत (जोतिबा डोंगर) भाविकांना अमानूष माराहण झाल्यामुळे महाराष्ट्र हादरला आहे. जोतिबा डोंगरावर भाविकांना अमानुष क्रूर मारहाण करणाऱ्या गुंड प्रवृत्ती च्या पुजार्यांना हटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, यासाठी भोगावती परिसरातील50हुन अधिक गावातील ग्रामस्थांच्या वतीने पुजाऱ्यांच्या या 'मुजोरी'चा आणि 'गुंडगिरी'चा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी येत्या सोमवार दि ३० मार्च २०२६ रोजी कोल्हापुरात भव्य ' महामोर्चा' काढण्यात येणार आहे. दर्शनासाठी आलेल्या निष्पाप भाविकांना पुजाऱ्यांनी ज्या क्रूरपणे आणि अमानुषपणे मारहाण केली, त्याविरोधात आता कोल्हापूरकरांचा संयम सुटला आहे.
सकाळी १० वाजता 'दसरा चौकात' जमण्याचे आवाहन
मिळालेल्या माहितीनुसार, या ऐतिहासिक महामोर्चाची सुरुवात सकाळी १० वाजता ऐतिहासिक दसरा चौक येथून होईल. येथून हा जनसागर लक्ष्मीपुरी, फोर्ड कॉर्नरमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. जिल्ह्यातील सर्व जोतिबा भक्तांनी, विविध सामाजिक संघटनांनी आणि आबालवृद्धांनी या अन्यायाविरोधात एकत्र येऊन सकाळी १० वाजेपर्यंत दसरा चौकात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन 'देवस्थान बचाव समिती' आणि संबंधित संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.
नेमके प्रकरण काय?
२२ मार्च रोजी आरतीच्या वेळी परिते (ता. करवीर) येथील भाविकांना किरकोळ कारणावरून १५ ते २० पुजाऱ्यांनी वेढा घालून लाथाबुक्क्यांनी आणि नारळाने बेदम मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाविकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. "देवाच्या दारातच जर भाविक सुरक्षित नसतील, तर न्याय कुणाकडे मागायचा?" असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.
मोर्चाच्या प्रमुख मागण्या:
पुजारी व्यवस्था बरखास्त करा मंदिरातील पुजाऱ्यांची मक्तेदारी संपवून सरकारी पगारी पुजाऱ्यांची नियुक्ती व्हावी.
मारहाण करणाऱ्या सर्व पुजाऱ्यांवर कडक कलमान्वये कारवाई करून त्यांना अटक करावी. जोतिबा डोंगरावर 'गुंडगिरी' संस्कृती मोडीत काढून भाविकांना सुरक्षित दर्शन मिळावे.
प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त
मोर्चाची व्याप्ती आणि लोकांचा संताप पाहता कोल्हापूर पोलीस दलाने शहरात मोठा बंदोबस्त तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० मार्च २०२६ रोजी होणाऱ्या या महामोर्चामुळे कोल्हापूरच्या रस्त्यांवर जनसागराचा महापूर लोटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.यावेळी परीते सरपंच मनोज पाटील, शिवसेना शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष - जनार्दन पाटील, घोटवडे सरपंच भोगावती संचालक धीरज डोंगळे,सरदार पाटील,सुनील कारंडे,सतीश लांबोरे,शिवाजी मेढे,चेतन पाटील, तानाजी जाधव व परीते व पंचक्रोशी ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित होते....

No comments:
Post a Comment