रायतली गडगपाडा येथे सूर्या कालवा फुटला; शेकडो एकर शेतीमध्ये माती साचल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान.



दर्पण जिल्हा प्रतिनिधी  संतोष ठाकरे 

    पालघर जिल्ह्यात सलग काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असतानाच, आता सिंचन विभागाच्या ढिसाळ कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पालघर तालुक्यातील रायतली गडगपाडा येथे २६ जुलै रोजी सकाळी ठीक ११:३० वाजताच्या सुमारास अचानक 'सूर्या कालवा' (पाट) फुटल्याची धक्कादायक घटना घडली. कालवा फुटल्यामुळे पाण्याचा प्रचंड प्रवाह थेट शेजारील शेतजमिनीत घुसला, ज्यामुळे परिसरातील भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.माती आणि गाळ साचल्याने भात पिके नष्टमिळालेल्या माहितीनुसार, कालव्याला मोठे भगदाड पडल्याने पाण्याचा प्रवाह इतका तीव्र होता की, पाटाच्या कडेला असलेली माती, दगड आणि गाळ वाहून थेट शेतकऱ्यांच्या तयार भातशेतीत जाऊन साचला. यामुळे अनेक शेतकऱ्यांची उभी पिके मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. आधीच अतिवृष्टीच्या संकटाचा सामना करणाऱ्या येथील बळीराजावर या अपघातामुळे दुहेरी संकट ओढवले असून, त्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. 

    तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी:

घटनेची माहिती मिळताच स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कालव्याच्या दुरुस्ती आणि देखभालीकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कालच पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, खासदार डॉ. हेमंत सावरा, आमदार राजेंद्र गावित आणि जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी केली होती. या पार्श्वभूमीवर, रायतली गडगपाडा येथील बाधित शेतकऱ्यांनीही शासनाने या भागाची तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने या शेतीचे युद्धपातळीवर पंचनामे करून पीडित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी आर्त हाक येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिली आहे.


No comments:

Post a Comment