सायखेड्यात डॉक्टरवर हल्ला; तिघांविरोधात गुन्हा, दोघांना अटक

 



प्रतिनिधी.  :-  गणेश ठाकरे लासलगाव 

   रिकामी कुरापत काढून डॉक्टर दांपत्यास जबर मारहाण व विनयभंग केल्याप्रकरणी सायखेडा पोलिस ठाण्यात तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

    याबाबत डॉ.प्रशांत वसंत कांडेकर यांनी सायखेडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत, डॉ.कांडेकर हे रविवार दि.८ मार्च रोजी सायंकाळी त्यांच्या ब्रिझा कारने (एमएच १५ जेएम ८३११) सोनगाव येथून भेंडाळी रोडमार्गे सायखेड्यातील सिद्धीविनायक हॉस्पिटलकडे येत होते. यावेळी सागर कापसे, ऋतिक कापसे व साहिल पटेल सर्व रा.सायखेडा या आरोपींनी मोटारसायकल (एम.एच १५ जे.टी ०८८६) ची डॉक्टरांच्या गाडीला पाठीमागून धडक दिली. घटनेनंतर डॉ.कांडेकर यांनी गाडी रस्त्याच्या कडेला थांबविल्यानंतर आरोपींनी त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली व लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी एका आरोपीने 'आज तुझा जीव घेतो' अशी धमकी दिली. धमकीनंतर जीव वाचविण्यासाठी डॉक्टर हॉस्पिटलकडे पळत असताना एका आरोपीने मोठा दगड उचलून त्यांच्या पाठीवर मारल्याने त्यांना मोठी दुखापत झाली. डॉक्टरांची पत्नी मध्यस्थी करण्यासाठी आली असता आरोपींपैकी एकाने तिचा हात धरून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. यानंतर डॉक्टर दांपत्य हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आरोपींनी सिद्धीविनायक हॉस्पिटलच्या काचेच्या दरवाजावर लाथा मारत दहशत निर्माण केली तसेच डॉक्टरांच्या ब्रिझा कारच्या काचा फोडून सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान केले असे म्हटले आहे. सदर घटना ग्रामस्थाना कळताच संतप्त नागरिक तसेच गोदाकाठ मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी सोनगाव - सायखेडा रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आला व दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. 

घटनेची माहिती मिळताच सायखेडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप घुगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र जमाव जास्त असल्याने निफाड पोलीस ठाणे निरीक्षक गणेश गुरव व सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आंदोलकांशी संवाद साधत जमावाला शांत केले.

या प्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात गु.र.न.

४३/२०२६, भा.न्या.संहिता २०२३ चे कलम ११८(१), ७४, ३२४(४), ११५(२), ३५१(२), ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आकाश व ऋतिक कापसे यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे.


No comments:

Post a Comment