वाळुंज कमलापूर रोडवर मध्यरात्री आग, दोन दूध डेअरी व पानटपरी जळून खाक ।



वाळुंज महानगर प्रतिनिधी : पांडुरंग गायकवाड. दैनिक दर्पन.

वाळुंज कमलापूर रोड परिसरात रविवारी (दि. ८) मध्यरात्री भीषण आग लागून दोन दूध डेअरी व एक पानटपरी पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली. ही घटना रात्री साधारण दोन वाजण्याच्या सुमारास वाळुंज गावातील तंटामुक्त कमानीलगत असलेल्या दुकानांमध्ये घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे तिन्ही दुकानदारांनी संध्याकाळी आपले कामकाज आटोपून दुकाने बंद केली होती व ते आपल्या घरी गेले होते. दरम्यान रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास वाळुंज गावातील काही भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर अचानक वीजप्रवाह वाढल्याने संबंधित दुकानांमध्ये इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यातूनच आग लागून तिन्ही दुकाने पूर्णतः जळून खाक झाली.

या आगीत दुकानांतील सर्व साहित्य जळून मोठे आर्थिक नुकसान झाले असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच आज गंगापूर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन प्राथमिक पंचनामा केला.

दरम्यान सध्या सुरू असलेल्या पवित्र रमजान महिन्यात ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे संबंधित दुकानदारांवर मोठे संकट कोसळले आहे. या दुकानांवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता. त्यामुळे अचानक आलेल्या या आगीमुळे त्यांच्या समोर उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच वाळुंज गावातील सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत दुकानदारांचे सांत्वन केले. तसेच शासनाने व संबंधित प्रशासनाने नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करावी, अशी मागणीही स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

पवित्र रमजान महिन्यात घडलेली ही घटना अत्यंत वेदनादायक असून समाजातील दानशूर व्यक्तींनी व प्रशासनाने या संकटग्रस्त दुकानदारांना मदतीचा हात द्यावा, अशी भावना परिसरातून व्यक्त होत आहे. 


No comments:

Post a Comment