निफाड तालुक्यात नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा २.० सुरू; ३६ गावांचा समावेश, शेतकऱ्यांना विविध घटकांवर अनुदान

 



प्रतिनिधी / गणेश ठाकरे लासलगाव 


:- निफाड तालुक्यात नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (टप्पा २.०) अंतर्गत ३६ गावांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्र शासन व जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी या प्रकल्पाच्या पोर्टलवर जाऊन अर्ज करावेत असे आवाहन निफाड तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी केले आहे.

       हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत व हवामान अनुकूल शेतीस प्रोत्साहन देणे हा प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांच्या गरजेनुसार वैयक्तिक शेतीत सुधारणा करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. शेतकरी गट व महिला बचत गटांना पूरक व्यवसायासाठीही मार्गदर्शन केले जाईल. गावातील नैसर्गिक संसाधनांचा अभ्यास करून मृद व जलसंधारण कामांना अर्थसहाय्य दिले जाणार आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर, पाण्याचा कार्यक्षम वापर, जमिनीची सुपीकता वाढविणे, कर्ब उत्सर्जन कमी करून कर्बग्रहण वाढविणे तसेच संवर्धित शेती पद्धती व पौष्टिक तृणधान्य उत्पादनावर भर देण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे निफाड तालुक्यातील शेती अधिक सक्षम, टिकाऊ व हवामान बदलास प्रतिकारक्षम होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

      वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी पाच हेक्टरपर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना विविध घटकांवर अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये ठिबक व तुषार सिंचनासाठी ७५ ते ८० टक्के अनुदान, वैयक्तिक शेततळ्यास १०० टक्के अनुदान, शेततळे अस्तरीकरणासाठी ५० टक्के अनुदान, विहीर पुनर्भरण, फळबाग लागवड, वृक्ष लागवड, बांबू लागवड, पाईप व पंप संच (अनुसूचित जाती-जमातींसाठी), रेशीम उद्योग, शेळीपालन, मत्स्यपालन, गांडूळ खत युनिट, नाडेप कंपोस्ट, बियाणे उत्पादन तसेच शेडनेट व हरितगृह यांचा समावेश आहे.

  या योजनेत सामूहिक लाभ योजनाही उपलब्ध असून शेतकरी उत्पादक संघटना, शेतकरी गट व महिला बचत गटांसाठी कृषिमाल साठवणुकीसाठी गोदाम उभारणीस २४ लाखांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. तसेच कृषि प्रक्रिया उद्योग व मूल्य साखळी बळकटीकरणासाठी ६० लाख ते १ कोटीपर्यंत अनुदान उपलब्ध राहणार आहे. या प्रकल्पासाठी विशेष पोर्टल विकसित करण्यात आले असून पात्र शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन निफाड तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी केले आहे.


• योजनेत समाविष्ट गावे :


रेडगाव, नांदूर खुर्द, सावरगाव, रानवड, खेडे, सारोळे खुर्द, ब्राह्मणगाव, वनस, टाकळी, विंचूर, विठ्ठलवाडी, सुभाष नगर, विष्णुनगर, निमगाव वाकडा, वेळापूर, पाचोरे खुर्द, हनुमान नगर, गोळेगाव, डोंगरगाव, दहेगाव, भरवस, नांदगाव, धानोरे, कोळगाव, देवगाव, महादेव नगर, मानोरी खुर्द, वाकद, शिरवाडे वाकद, चाटोरी, कानळद, सावळी, रामनगर, पिंपळगाव, निपाणी व तामसवाडी.


No comments:

Post a Comment