बुद्ध धम्माच्या प्रचारासाठी गावोगावी बौद्धाचार्य व बुद्ध विहारे उभे राहावेत – किशोर जोहरे
जंगलागाव (ता. सोयगाव) येथे दहा दिवसीय श्रामनेर व बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप
प्रतिनिधी सोयगाव..दिलीप मोरे..
सोयगाव : बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार प्रभावीपणे व्हावा यासाठी गावोगावी बौद्धाचार्य आणि बुद्ध विहारे उभे राहणे गरजेचे आहे. या माध्यमातून समाजात धम्माचे विचार रुजले तर देशात पुन्हा सम्राट अशोकांच्या सुवर्णकाळासारखी स्थिती निर्माण होऊ शकते, असे मत भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक तथा समता सैनिक दलाचे जनरल मेजर किशोरजी जोहरे यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील जंगलागाव (ता. सोयगाव) येथील भीमनगरमध्ये भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा छत्रपती संभाजीनगर (पूर्व) यांच्या वतीने ४ ते १३ मार्च दरम्यान दहा दिवसीय श्रामनेर व बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप शुक्रवारी (दि.१३) झाला.
छत्रपती संभाजीनगर (पूर्व) जिल्हा अध्यक्ष अरविंद कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारोप सोहळ्यात धम्मपीठावर भंते नागार्जुन तथा केंद्रीय शिक्षक एस. टी. काळे, राज्य संघटक किशोरजी जोहरे, जिल्हा कोषाध्यक्ष प्रकाश हिवराळे, जिल्हा उपाध्यक्ष भारत पगारे, जिल्हा संस्कार सचिव वसंत पगारे, महिला जिल्हा संघटीका कमलाबाई मधुकर पगारे, कन्नड तालुका अध्यक्ष रमेश धनेधर आणि सोयगाव तालुका अध्यक्ष मुकुंदा वाहुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिरादरम्यान भंते नागार्जुन यांनी श्रामनेर व बौद्धाचार्य शिबिरार्थींना दहा दिवस बुद्ध धम्माचा सखोल अभ्यास देत भावी जीवनात धम्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मार्गदर्शन केले. समारोप प्रसंगी गाथा घेऊन चीवर उतरविण्यात आले तसेच शिबिरार्थींना मान्यवरांच्या हस्ते श्रामनेर प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना किशोरजी जोहरे यांनी उपस्थित पदाधिकारी, भिक्खू गण, श्रामनेर संघ तसेच उपासक-उपासिकांना धम्माच्या प्रचारासाठी तन, मन, धन आणि वेळेचे दान देण्याचे आवाहन केले. तसेच संस्थेने ठरवून दिलेल्या २५ सूत्री उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी गावोगावी कार्यक्रम आयोजित करून धम्म रुजविण्याचे आवाहन केले.
जिल्हा अध्यक्ष अरविंद कांबळे यांनी आपल्या मार्गदर्शनात सोयगाव तालुक्यातील हे शिबिर यशस्वी ठरल्याचे सांगितले. पुढील काळात तालुका शाखेतर्फे विविध प्रकारची शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष प्रकाश हिवराळे, जिल्हा उपाध्यक्ष भारत पगारे, कन्नड तालुका अध्यक्ष रमेश धनेधर, जिल्हा संस्कार सचिव वसंत पगारे, महिला तालुका अध्यक्ष सुरेखा तायडे, सुशीला इंगळे व कु. आरुषी सोनवणे यांनी श्रामनेर संघाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका संघटक संजय सोनवणे, संतोष मोरे, परमेश्वर मोरे, भगवान सोनवणे, रवींद्र साळवे, रवी बिऱ्हारे, जयदीप जाधव, दिनेश सोनवणे, प्रमिला निकम तसेच जंगलागाव, गलवाडा, जरंडी, कवली येथील सरपंच वसंत बनकर आणि परिसरातील बौद्ध उपासक-उपासिकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जिल्हा उपाध्यक्ष भारत पगारे यांनी मानले.
या कार्यक्रमास सोयगाव तालुका व परिसरातील बौद्ध उपासक-उपासिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
फोटो ओळ,
समारोप कार्यक्रमाला उपस्थित बौद्ध उपासक-उपासिका.

No comments:
Post a Comment