अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी कठोर कारवाई सुरु – पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन
प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी
हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाकडून कठोर कारवाई सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे कोढूर येथील सराईत गुन्हेगार ज्ञानेश्वर दादाराव पतंगे (रा. कोंदूर, ता. कळमनुरी) याला हिंगोली जिल्ह्यातून तीन महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. संबंधित आरोपीविरुद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात शरीराविरुद्धचे अनेक गुन्हे दाखल असून त्याच्या वर्तनात सुधारणा व्हावी म्हणून पोलिसांनी यापूर्वी अनेकवेळा प्रतिबंधक कारवाई केली होती. मात्र त्याच्या वर्तनात कोणतीही सुधारणा दिसून न आल्याने सामाजिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता निर्माण झाली होती. यामुळे कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी महाराष्ट्र पोलीस
कायदा कलम ५६ अन्वये आरोपीस जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्फत उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर केला. प्रस्तावाचे परीक्षण केल्यानंतर संबंधित इसम हा कायदा-सुव्यवस्थेस बाधक ठरत असल्याचे लक्षात घेऊन उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) अन्वये ज्ञानेश्वर दादाराव पतंगे यास हिंगोली जिल्हा हद्दीतून तीन महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले. दरम्यान, जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर यापुढेही कठोर प्रतिबंधक कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचेपोलीस प्रशासन तर्फे सांगण्यात आले आहे

No comments:
Post a Comment