जरंडी तांड्यातील वृद्धेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ बंजारा ब्रिगेडचा सोयगाव तहसीलवर जनआक्रोश मोर्चा



सोयगाव प्रतिनिधी..दिलीप मोरे...

सोयगाव तालुक्यातील जरंडी तांडा येथे ८० वर्षीय वृद्ध महिलेवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ बंजारा ब्रिगेडच्या वतीने गुरुवारी सोयगाव तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सकल बंजारा समाजासह विविध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोर्चाला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर जुना बाजार चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चाचे मार्गक्रमण करण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड यांनी केले.

आंदोलकांनी आरोपी रमजान शेख व त्याच्या सहकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवले. जरंडी तांडा येथे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी तसेच प्रकरणाचा निकाल लवकर लागण्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवण्यात यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. याशिवाय या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणीही करण्यात आली.

पीडित वृद्ध महिलेला शासनाकडून २० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी तसेच तिला पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. भविष्यात तांड्यातील बंजारा भटक्या-विमुक्त समाजातील महिलांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली.

दरम्यान, २०१७ मध्ये सोयगाव तालुक्यातील हनुमंतखेडा तांडा येथे घडलेल्या घटनेची पुन्हा चौकशी करण्यात यावी व दोन्ही घटनांमागील कारणांचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही बंजारा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोयगाव, फरदापूर व अजिंठा येथील पोलिस कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तासाठी तैनात होते. शासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन पीडितेला न्याय द्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.

No comments:

Post a Comment