शेतातील भीषण आगीत शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; देऊळगाव गुजरीत हळहळ

देऊळगाव गुजरी येथे शेतात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवताना शेतकरी गोकुल जयस्वाल यांचा होरपळून मृत्यू झाल्याने घटनास्थळी पाहणी करताना महसूल व पोलिस अधिकारी.


आग विझवताना वाऱ्यामुळे आगीने घेतले रौद्ररूप; गोकुल जयस्वाल यांचा जागीच दुर्दैवी अंत

प्रतिनिधी सोयगाव..दिलीप मोरे..

जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे शेतात लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करत असताना एका शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि.१२ मार्च) दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास घडली. गोकुल बाबुलाल जयस्वाल (वय ६०) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव गुजरी परिसरातील शेतकरी गोकुल जयस्वाल यांच्या शेतातील वाळलेल्या गवताला अचानक आग लागली. आग वाढत असल्याचे लक्षात येताच त्यांनी स्वतःच शेतातील आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र त्या वेळी अचानक जोरदार वारा सुटल्याने आगीने क्षणातच भीषण रूप धारण केले.वाऱ्यामुळे आगीच्या ज्वाळा वेगाने पसरल्या आणि जयस्वाल हे त्या आगीत अडकले. आगीत गंभीररीत्या होरपळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच महसूल व पोलिस प्रशासन तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

तहसीलदार नानासाहेब आगळे, फत्तेपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव व पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास फत्तेपूर पोलीस करीत आहेत.

या दुर्दैवी घटनेमुळे देऊळगाव गुजरीसह परिसरात शोककळा पसरली आहे. गोकुल जयस्वाल यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून स्थानिक नागरिकांनी शासनाने पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.


No comments:

Post a Comment