जगप्रसिद्ध Ajanta Caves येथे मधमाशांचा हल्ला; देशी-विदेशी सुमारे 100 हून अधिक पर्यटक जखमी
लेणी परिसरातील बस पार्किंगजवळ घटना; काही पर्यटकांना खाजगी दवाखान्यात तर काहींना ग्रामीण रुग्णालयात उपचार
प्रतिनिधी सोयगाव..दिलीप मोरे..
जगप्रसिद्ध Ajanta Caves परिसरात मंगळवारी (दि.१०) दुपारच्या सुमारास अचानक मधमाशांच्या थव्याने पर्यटकांवर हल्ला केल्याने एकच गोंधळ उडाला. लेणी परिसरातील बस पार्किंगजवळ ही घटना घडली. मधमाशांच्या चाव्यामुळे देशी-विदेशी पर्यटकांसह स्थानिक नागरिक असे मिळून अंदाजे १०० ते १२० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
दुपारी सुमारे चार वाजण्याच्या दरम्यान लेणी पाहून बाहेर येणारे तसेच लेणी पाहण्यासाठी येणारे पर्यटक बस पार्किंग परिसरात थांबले असताना अचानक मधमाशांचा थवा आला. काही क्षणातच मधमाशांनी अनेकांना चावा घेतल्याने पर्यटकांमध्ये घबराट पसरली.
यामध्ये परदेशी पर्यटक सुमारे दहा, श्रीलंकेतील पर्यटकांच्या गटातील सुमारे ऐंशी जण, तसेच Jabalpur येथील दहा पर्यटक आणि फर्दापूर परिसरातील काही स्थानिक नागरिकांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.या घटनेत सात वर्षांच्या एका मुलीच्या चेहऱ्यावर मधमाशांनी चावा घेतल्याने तिचा चेहरा सुजल्याची माहिती मिळाली आहे. तिच्या आईलाही हातावर मधमाशांनी चावा घेतला आहे.
दरम्यान, बस पार्किंगमध्ये आलेल्या काही पर्यटकांच्या बस तातडीने परत वळवून बाहेर काढण्यात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
जखमी झालेल्या काही पर्यटकांनी स्वतःच्या वाहनातून खाजगी दवाखान्यांकडे धाव घेतली, तर काहींना अजिंठा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
या घटनेमुळे काही काळ लेणी परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

No comments:
Post a Comment