गावागावात गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी ‘ग्राम संरक्षण दल’ स्थापन



वाळुंज पोलीस ठाण्याचा पुढाकार; नागरिकांच्या सहभागातून रात्रीची गस्त वाढणार

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – दैनिक. दर्पण प्रतिनिधी वाळूज महानगर पांडुरंग गायकवाड 

समाजात वाढती लोकसंख्या, बेरोजगारी, गरीबी व नैराश्यामुळे गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वाळुंज पोलीस ठाण्याच्या वतीने गावपातळीवर गुन्हे रोखण्यासाठी पुढाकार घेत ग्राम संरक्षण दल स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमामुळे गावांमध्ये नागरिकांच्या सहभागातून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.

पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपआयुक्त पंकज अतुलकर तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. भाग्यश्री पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसह मौजे देवगाव, जिकठाण, येवसगाव व परिसरात ग्राम संरक्षण दल स्थापनेसाठी बैठक घेतली.

या बैठकीत प्रत्येक गावातून सुमारे ४० सदस्यांचे ग्राम संरक्षण दल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सदस्यांना पोलीसांकडून आवश्यक प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाणार असून, लवकरच शर्ट, लाठी, शिट्टी व बॅटरी यांसारखी आवश्यक साहित्यही देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

ग्राम संरक्षण दलाच्या माध्यमातून पोलीस स्टेशनच्या दैनंदिन कामात मदत होणार असून, विशेषतः रात्रीच्या वेळी सतर्क गस्त घालून चोरी, जबरी चोरी व दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच गावांमध्ये किरकोळ वाद उद्भवल्यास त्याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहनही करण्यात आले.

या कार्यक्रमाला गावातील नागरिक, पोलीस पाटील व ग्राम संरक्षण दलाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये रमेश राठोड, पो. ऊ. नि.अजय शितोळे,   पांडुरंग शेळके, विजय पिंपळे अमोल गायकवाड, सुधीर कांबळे खोसरे साहेब आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते

या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मोझे देवगाव, जिकठाण, येवसगाव व परिसरातील येथील पोलीस पाटील व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. 

No comments:

Post a Comment