अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा पहिला बळी; कुटुंबावर काळाचा घाला.
दर्पण न्यूज (नेवासा)प्रतिनिधी: नवनाथ घावटे
राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील मापरवाडी परिसरात सोमवारी सायंकाळी वीज कोसळून सोमनाथ जिजाबापू गाडगे (वय 36) या तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमनाथ यांची मापरवाडी परिसरात दोन ठिकाणी शेती असून, घरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील शेतात त्यांनी कांद्याची लागवड केली होती. त्या दिवशी कांदा काढणीसाठी महिला मजुरांना कामावर ठेवले होते.
दिवसभर काढणी सुरू असताना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली. मजूर पावसापासून बचावासाठी प्लास्टिकच्या आडोशाला थांबले असताना काही अंतरावर उभ्या असलेल्या सोमनाथ यांच्यावर अचानक वीज कोसळली. मोठा आवाज होताच आगीचे लोळ त्यांच्या अंगावर पडले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर त्यांना तत्काळ प्रवरा रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली आणि आई असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे लोणी खुर्द परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, सायंकाळी परिसरात अवकाळी पावसासह विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचा जोर अनुभवायला मिळाला. काही ठिकाणी गारपीटही झाली. या पावसामुळे फळबागा, भाजीपाला आणि रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक धोक्यात आले आहे.
पुढील तीन दिवसही अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर खात्यात जमा करावी आणि कोणत्याही अटींशिवाय शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

No comments:
Post a Comment