आपले सरकार सेवा केंद्र भरती मधील निवड समितीची चौकशीची मागणी
प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी
जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र चालक भरती प्रक्रियेत निवड समितीने मनमानी कारभार केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ मुंबई येथे भेट घेऊन निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हा उपाध्यक्ष बालlजी पांडुरंग जाधव यांनी यासंदर्भात पुढाकार घेऊन प्रशासकीय स्तरावर सुरू असलेल्या अनियमितेवर बोट ठेवले आहे.
हिंगोली जिल्ह्यात सुमारे ४३० आपले सरकार केंद्रांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. या प्रक्रियेसाठी संपूर्ण जिल्ह्यातून ३१०० अर्ज प्राप्त झाले होते. मात्र, निबड समितीने अत्यंत तांत्रिक आणि किरकोळ कारणांचा आधार घेत तब्बल १४०० अर्ज अपात्र ठरवले आहेत. अर्जदारांनी चालू वर्षाची
करपावती जोडली नाही, भाडेकरार किंवा नमुना नंबर ८ जोडला नाही, अशा किरकोळ त्रुटी काढून अनेक पात्र तरुणांना जाणीवपूर्वक प्रक्रियेतून बाहेर काढल्याचा आरोप बालाजी जाधव यांनी केला आहे. प्रशासनाचा हा निर्णय सुशिक्षित बेरोजगारांवर अन्याय करणारा असल्याचे त्यांनी
निवेदनात म्हटले आहे.
विशेष म्हणजे, अर्ज छाननीनंतर दीड महिन्याचा कालावधी उलटल्यावर निवड समितीने जी पात्र यादी प्रसिद्ध केली, त्यामध्ये गुणदान करताना कोणत्याही ठोस नियमावलीचे पालन करण्यात आलेले नाही. समितीने आपल्या मर्जीतील उमेदवारांना झुकते माप देऊन मनमानी पद्धतीने गुण दिले असून, प्रसिद्ध केलेल्या यादीवर अनेक उमेदवारांनी लेखी आक्षेपही नोंदवले आहेत. एकीकडे शासन पारदर्शक कारभाराचा दावा करत असताना, दुसरीकडे हिंगोलीत मात्र निवड समितीने नियमांना हरताळ फासल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी तातडीने चौकशी समिती नेमावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जे खरे पात्र लाभार्थी आहेत, त्यांच्यावर अन्याय होऊ नये आणि ज्या अधिकाऱ्यांनी किंवा समिती सदस्यांनी या प्रक्रियेत पदाचा गैरवापर केला आहे. त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असेही राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हा उपाध्यक्ष बालाजी जाधव यांनी स्पष्ट केले आहे. अन्याय झालेल्या लाभाथ्यर्थ्यांना नवीन सेवा केंद्र देऊन न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.

No comments:
Post a Comment