महाडमध्ये भव्य स्वच्छता अभियान: ४.१६ टन कचऱ्याची विल्हेवाट



 पत्रकार संभाजीराव सूर्यवंशी (महाड प्रतिनिधी)

महाड: महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने महाड शहरात भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पद्मभूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान उत्साहात पार पडले.या अभियानाअंतर्गत महाड शहरातील प्रमुख रस्ते, सार्वजनिक ठिकाणे व परिसरातील कचरा साफ करण्यात आला. विशेषतः काच, प्लास्टिक तसेच इतर घनकचरा हटवून शहर स्वच्छ करण्यासाठी स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला.

स्वच्छता मोहिमेदरम्यान शहरातील विविध भागांत साचलेला ओला व सुका मिळून तब्बल ४.१६ टन कचरा गोळा करण्यात आला. संकलित कचऱ्याची योग्य पद्धतीने डंपिंग ग्राउंड येथे विल्हेवाट लावण्यात आली.डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत यापूर्वीही विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. वृक्षारोपण व संवर्धन, दिव्यांगांसाठी साहित्य वितरण, रक्तदान शिबिरे तसेच आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून समाजसेवेची परंपरा जोपासली जात आहे.

या स्वच्छता अभियानात स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.


No comments:

Post a Comment