डाभा शिवारात पुन्हा बिबट्याचा हल्ला; २ बकऱ्या ठार, एक जखमी – वाढत्या घटनांनी ग्रामस्थ दहशतीत
सोयगाव प्रतिनिधी...दिलीप मोरे..
सोयगाव तालुक्यातील डाभा शिवारात बिबट्याने पुन्हा धुमाकूळ घालत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. दि. १६ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री झालेल्या ताज्या हल्ल्यात दोन बकऱ्या ठार झाल्या असून एक बकरी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण अधिकच तीव्र झाले आहे.
गट क्रमांक १० मधील शेतकरी आशाबाई राजू शेळके यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये घुसून बिबट्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात एक बकरी जागीच ठार झाली, तर एक बकरी उचलून नेण्यात आली. तसेच राजू पांडुरंग दांडगे यांच्या एका बकरीला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेत अंदाजे ४० ते ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
पूर्वीची घटनाही ताजीच:
याआधी दि. १२ मार्च रोजी कमलबाई रमेश रगड यांच्या बकऱ्यांवरही बिबट्याने हल्ला केला होता. त्या घटनेसह आतापर्यंत एकूण ६ बकऱ्या व बोकडांचा बळी गेला असल्याने बिबट्याचा वाढता धोका स्पष्ट झाला आहे.घटनेची माहिती मिळताच सरपंच राहुल हेलोडे यांनी वनविभागाशी संपर्क साधला. वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.दरम्यान, गट क्रमांक ८२ व ८३ परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे शेतात जाणाऱ्या महिला व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांची ठाम मागणी:
बिबट्याच्या सलग हल्ल्यांमुळे परिस्थिती गंभीर बनली असून तातडीने पिंजरा लावून बिबट्याला पकडण्यात यावे तसेच बाधित शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
प्रशासनाला इशारा:
वेळीच उपाययोजना न केल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत असून वनविभागाने तातडीने ठोस कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

No comments:
Post a Comment