ज्येष्ठ कामगार नेते व पत्रकार अशोक शांतवन आल्हाट यांचे दुःखद निधन


श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील मूळ रहिवासी व सध्या वाळुंज येथे वास्तव्यास असलेले ज्येष्ठ पत्रकार तसेच भारतीय कामगार युनियनमध्ये सक्रिय सहभाग घेऊन कामगारांच्या हक्कासाठी आयुष्यभर लढणारे श्री अशोक शांतवन आल्हाट (वय ७८) यांचे दिनांक १७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजता पंढरीनाथ विखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल, विळद घाट (जि. अहिल्यानगर) येथे दुःखद निधन झाले.

श्री आल्हाट यांनी बजाज ऑटोमध्ये सेवा बजावत असताना कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा दिला. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम आणि त्यांची ठाम भूमिका यामुळे ते सर्वांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करून गेले. उद्योगपती राहुल बजाज यांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांची ओळख होती.

कडवट स्वभावाचे भासले तरी अंतःकरणाने अतिशय संवेदनशील व माणुसकी जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते ओळखले जात. कोणत्याही अडचणीत असलेल्या व्यक्तीला हसतमुखाने सल्ला देणे, मार्गदर्शन करणे ही त्यांची खासियत होती. त्यांच्या निधनाने कामगार चळवळीतील एक खंबीर आधारवड हरपला आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, सून, नातवंडे व भाऊ असा मोठा परिवार आहे.त्यांच्या जाण्याने केवळ कुटुंबियांचाच नव्हे तर समाजातील सर्व स्तरांतील लोकांचा एक जिव्हाळ्याचा, मार्गदर्शक व्यक्ती हरपला आहे. त्यांच्या आठवणी सदैव प्रेरणादायी राहतील.नाना यांच्या आत्म्यास चिरंतन शांती लाभो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.— पत्रकार पांडुरंग गायकवाड सहपरिवार 

No comments:

Post a Comment